Join us

SRI Method Of Rice Farming : 'श्री' पद्धतीची भातशेती, दुप्पट उत्पादनाची हमी, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:38 AM

Paddy Cultivation : कमी लागवड खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या भात लागवडीसाठी 'श्री' ही आधुनिक पद्धत फायदेशीर ठरत आहे.

- सुभाष गरपडे Rice Farming : भातशेतीत (Rice Farming) मेहनत करणारे अनेक शेतकरी असतात. परंतु नियोजनाचा अभाव शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाऐवजी पारंपरिक पद्धतीने भातशेती करीत असल्यामुळे भातपीक लागवडीचा (Paddy Cultivation) खर्च जास्त, त्यामानाने उत्पादन कमी येत असल्यामुळे शेती करणे ही बाब महागडी ठरत आहे. कमी लागवड खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या भात लागवडीसाठी 'श्री' ही आधुनिक पद्धत अत्यंत प्रभावी व फायदेशीर ठरत आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ होत असल्याचे कृषी विभागाकडून (Agri Department)  सांगितले जाते. 

या पद्धतीमध्ये बियाणांचा खर्च, लागवडीचा खर्च कमी होतो. पाण्याची जवळपास ३० ते ४० टक्के बचत होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. जगामधील मादागास्कर, फिलिपाईन्स, नेपाळ, कंबोडिया, म्यानमार, इंडोनेशिया, श्रीलंका, झांबिया, चीन यासारख्या जवळपास ४० देशांमध्ये प्रभावीपणे ही पद्धती वापरली जाते. भारतामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये 'श्री' पद्धतीने भातशेती केली जाते. लागतात. 

दोन्हीमधील फरक

भात शेतीच्या पारंपारिक पद्धतीत हेक्टरी 40 किलो बियाणे आवश्यक असते या बियाण्यांना 10 ते 12 दिवसानंतर फुटवे येतात. हेक्टरी 45 हजार रुपयांचा खर्च येतो. तर उत्पादन हे 40 क्विंटलपर्यंत येते. मात्र श्री पद्धतीमध्ये हेक्टरी 08 ते 12 किलो बियाणे आवश्यक असतात. तर 40 ते 50 दिवसात फुटवे येतात. या पद्धतीत 30 ते 32 हजार रुपयांचा हेक्‍टरी खर्च येतो. तर उत्पादन जवळपास 80 क्विंटल पर्यंत येत असते.

अशी केली जाते लागवड 

या पद्धतीमध्ये भाताची रोपे गादीवाफ्यावर तयार करून घ्यावी लागतात. रोपे ९ ते १२ दिवसांची झाली की त्यांच्या मुळांना न दुखावता जागी एकच रोप लावावे लागते. दोन रोपांमध्ये आणि दोन ओळींमध्ये २५*२५ सेंटीमीटर अंतर ठेवावे लागते. त्यामुळे रोपांमध्ये स्पर्धा न होता जमिनीत अन्नघटक योग्य प्रकारे मुरते व पिकांना मिळत असते. यात शेतात पाणी भरून ठेवावे लागत नाही. रासायनिक खताऐवजी शेणखत, गांडूळ खत, नत्र, स्फुरद व पालाश यांचा वापर फायदेशीर ठरतो.

श्री पद्धतीची भात शेती म्हणजे काय? एसआरआय म्हणजेच सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन अर्थात 'श्री' ही भात शेतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणारी लागवडीची पद्धत आहे. १९८० च्या दशकात मादागास्कर येथील फादर हेन्री डी लॉलानी यांनी ही पद्धत विकसित केली. ज्याद्वारे माती, पाणी, पोषक द्रव्य आणि बियाणे यांचे योग्य व्यवस्थापन करून कमीत कमी उत्पादन खर्चात पारंपरिक पद्धतीपेक्षा जवळपास दुप्पट उत्पादन मिळवून देणारी ही पद्धती विकसित केली आहे.

टॅग्स :भातशेतीलागवड, मशागतनाशिकशेती क्षेत्र