खरीप हंगाम तोंडावर आला असून मशागतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे आगामी काळात खरीप पिकांच्या लागवडीसाठी पाणी भरणीसाठी वीजपंप, सोबत लागणारी केबलची गरज भासणार आहे. मात्र तत्पूर्वीच अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप आणि केबल चोरीचे प्रकार समोर आले आहेत. राज्याच्या अनेक भागातून अशा घटना समोर येत असून शेतकऱ्यांच्या शेतातून केबल, वीजपंप चोरीला गेले आहेत. या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतीची कामे सुरु झाली असून शेतीसाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते, यात मुख्यत्वे वीजपंप आणि केबलची खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. शिवाय या दोन्ही गोष्टी महागड्या देखील असतात, त्यामुळे वीजपंप आणि केबल चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील भालोद शिवारातील बामणोद रस्त्यावरील मगनलाल गडे या शेतकऱ्यांच्या शेतातून विहिरीवरील पंप, केबल तसेच ट्यूबवेलची केबल चोरीला गेली आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. शनिवारी शेतकरी अशोक देवराम महाजन यांच्या शेतातील विहिरीवरील पंप व केबल लांबविली आहे.
शेती साहित्य चोरीच्या प्रमाणात वाढ
यंदा खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कमी पाऊस तसेच अवकाळीचा फटका बसला आहे. अशातच मे महिन्यात केळी वाचविणे जिकिरीचे असते. त्यात पंप व केबल चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील मोटार पंपांच्या केबलची चोरी दोन वेळा झाली होती. मात्र, पोलिसांत तक्रार देऊनही अद्यापही चोरट्यांचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी याबाबत गांगीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.
वीज पंप चोरीला गेल्याने केळी वाचवायची कशी?
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली जाते, त्यात यावल तालुक्यातील भालोद बामणोद हा परिसरात केळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात केळी, हळद यासह भाजीपाल्याचे पीकही घेतले जाते. मे महिन्यात अति उष्णतेमुळे केळी वाचविणे जिकरीचे होते. यासाठी सतत पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र या भागात अनेक शेतकयांचे वीज पंप व केबल चोरीला गेल्याने केळी वाचवायशी कशी? असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. वीज पंप व केबलचे दर वाढले आहेत. हा नेहमीच प्रश्न आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी.