मनोज शेलार
नंदुरबार : राज्यभरात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्याचबरोबर सातपुडा परिसरातही स्ट्रॉबेरीचा गोडवा दिवसेंदिवस वाढत आहे, अवघ्या दोन हेक्टर क्षेत्रावर सुरू झालेली स्ट्रॉबेरीची लागवड आता 29 हेक्टरवर पोहोचली आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे त्याला काहीसा फटका बसू लागला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या उंच पठारावरच्या डाब, वालंबासह तोरणमाळच्या भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग दहा वर्षांपूर्वी काही शेतकऱ्यांनी केला होता. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. तोरणमाळच्या भागातील शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला, परंतु अक्कलकुवा तालुक्यातील डाब, वालंबा परिसरातील शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढविण्यासाठी मेहनत घेतली. आज पाहता पाहता तब्बल 29 हेक्टर परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड होऊ लागली आहे. येत्या काळात ५० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी ठेवले आहे.
उच्च दर्जाचे वाणदरम्यान येथील स्ट्रॉबेरीची लागवड ही उच्च दर्जाच्या वाणाद्वारे केली जाते. त्यासाठी कृषी विद्यापीठात संशोधित किंवा महाबळेश्वर व इतर भागातून चांगल्या प्रतीची रोपे आणून येथील शेतकऱ्यांना कृषी विभाग उपलब्ध करून देत असतो. त्यात विंटरडॉन, स्वीट सीनचाई आणि स्वीट चार्ली या वाणांचा समावेश आहे. कृषी विभागातर्फे वेळोवेळी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जात असल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. पूर्वी हेक्टरी दीड ते दोन टन उत्पादन होत होते. आता ते तीन टनापर्यंत जात असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
स्ट्रॉबेरीची ख्याती आता परराज्यात
तसेच येथील स्ट्रॉबेरीची ख्याती आता परराज्यातदेखील पसरली आहे. इंदोर, सुरत येथील व्यापारी येथून स्ट्रॉबेरी खरेदी करून घेऊन जात आहेत. पूर्वी स्थानिक ठिकाणीच विक्री केली जात होती. काही शेतकरी थेट नंदुरबार, शहादा, तळोदाच्या मार्केटमध्ये विकण्यासाठी आणत होते. परंतु, कृषी विभागाच्या मदतीने आकर्षक पॅकेजिंगसाठी विविध योजनांमधून निधी मिळवून देत मार्केटिंगवर भर देण्यात आला. त्यामुळे महानगरांमध्येदेखील सातपुड्याची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध झाली आहे. इंदोर व सुरत येथील व्यापारी स्वत: येथे येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र यंदा स्ट्रॉबेरीचे उत्पादन जास्त झाल्याने भाव कमी झाला आहे. हंगामाच्या सुरूवातीला २०० रुपये किलो दराने विक्री झाली. आता मात्र १२० ते १५० रुपये किलो दराने विक्री करावी लागत आहे.
प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न
एकीकडे या परिसरात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. कमी कालावधीत जास्त उत्पन्न अशी या पिकाची ओळख असल्याने अनेक शेतकरी या पिकाच्या लागवडीसाठी आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळेच येत्या काळात किमान ५० हेक्टर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील उंच पठारावरील भागात स्ट्रॉबेरीसाठी अनुकूल वातावरण आहे. दरम्यान स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करून त्याचे उपउत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. क्रश, पल्प, जॅम आदी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे.