Join us

अवकाळीने कांदा पिकाचे नुकसान, केंद्रीय समितीचा पाहणी अभ्यास दौरा 

By गोकुळ पवार | Published: December 06, 2023 2:05 PM

Nashik : काही दिवसांपूर्वी अवकाळी आणि गारपिटीने अनेक पिकांचे नुकसान झाले यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचेही झाले. कांदा उत्पादक ...

Nashik :काही दिवसांपूर्वी अवकाळी आणि गारपिटीने अनेक पिकांचे नुकसान झाले यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचेही झाले. कांदा उत्पादक शेतकरी यावर उपाययोजना करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे केंद्रीय समितीकडून उत्पादन वाढीसाठी नाशिकसह देशभरातील कांदा उत्पादक ठिकाणचा अभ्यास केला जात असून, यासाठी समितीचा तिसरा पाहणी दौरा होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी पथकाने दिली. 

नाशिकमध्ये केंद्रीय समितीच्या पथकाने राज्यातील कृषी अधिकारी, कृषी संचालकांची ऑनलाइन बैठक घेतली. गारपिटीने नाशिक विभागात तब्बल 44 हजार 240 हेक्टरवरील भात, द्राक्ष, कांदा, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकसह राज्यात कांद्याचे लागवड क्षेत्र कमी झाल्याबद्दल समितीने बैठकीत चिंता व्यक्त केली. लागवड कशी वाढेल, यावर उपाय शोधा, कांद्यासाठी पाण्याचे स्त्रोत कसे वाढतील, यावर उपाय शोधून पुढच्या बैठकीत सांगा, असे आदेश समितीने दिले. खान्देशातील कापूस उत्पादकांवर आलेले संकट व उपाय यावरही चर्चा होऊन अहवाल केंद्राला देणार असल्याचे आश्वस्त करण्यात आले.

राज्यातील जिल्हा कृषी अधिकारी, कृषी संचालक, सहसंचालक आदी बैठकीस उपस्थित होते. कृषी संचालक मोहन वाघ यांनी नुकसानीची माहिती बैठकीत दिली. पहिल्या दिवशी चांदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना समितीने भेट दिल्याचे सांगितले जात आहे. आता पुन्हा पंधरा दिवसांनी अजून एक समिती कांदा लागवड, कांदा उत्पादकांवर आलेले संकट, झालेले नुकसान व उपाय आणि अभ्यास करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे तीन-तीन वेळा केंद्रीय समिती जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने आपल्या पदरी तरी काय पडणार? असा सवाल आता शेतकरी विचारीत आहेत.

शेतकऱ्यांच म्हणण कोण ऐकणार? 

'कांद्याला जेव्हा भाव राहत नाही, तेव्हा राज्य सरकार, केंद्र सरकार, इतर समित्या यांच्यापैकी कोणीही येत नाही. मग आता कुठेतरी कांद्याला काहीसा भाव मिळू लागल्यानंतर समितीचे दौरे होऊ लागले आहेत. अनेकवेळा कांद्याला भावच नसतो. याचवर्षी जानेवारीपासून आगस्टपर्यंत भावच नव्हते, तेव्हा कोणीही शेतकऱ्याची दखल घेतली नाही. किंवा शेतकऱ्याला मदत मिळू शकली नाही'. आता केंद्रीय समिति अभ्यास दौरा करत असताना कांदा उत्पादक शेतकरी किंवा शेतकरी संघटना यांच्यापैकी कुणालाही मध्यस्थी घेतले नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :कांदानाशिकशेती