Join us

Agriculture News : दूध काढणी यंत्र आणि मुक्त गोठ्यासाठी अनुदान, 208 पशुपालकांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 5:04 PM

Agriculture News : दूध काढणी यंत्र आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी जिल्ह्यातील 208 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली.

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे सेस अनुदानातून राबवण्यात येणाऱ्या दूध काढणी यंत्र आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी जिल्ह्यातील 208 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यात सर्वाधिक शेतकरी हे संगमनेर व नेवासा तालुक्यातील आहेत.

अहमदनगर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समितीच्या सभेत ही लॉटरी काढण्यात आली. यात दूध काढणी यंत्रासाठी जिल्ह्यातून 3313 अर्ज प्राप्त झाले होते. या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या शेष मधून वीस लाख रुपयांची तरतूद केलेली होती. 

योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दूध काढणी यंत्र खरेदीसाठी यंत्राच्या एकूण किमतीच्या ६० टक्के किंवा जास्तीत जास्त १५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत जिल्हाभरातील १३३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मुक्तसंचार गोठ्यासाठी १५ लाख रुपयांची तरतूद पशुसंवर्धन विभागाने केली होती. या योजनेसाठी ३ हजार ४६४ अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरी पद्धतीने यातून ७५ लाभार्थी निवडण्यात आले.

दिव्यांग, महिलांना प्राधान्य

ही योजना राबवताना तीन टक्के दिव्यांग आणि 30 टक्के महिला यांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी डॉक्टर दशरथ दिघे यांनी दिली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांच्या दालनात अभ्यागतांच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली.

तालुका निहाय लाभार्थी

दूध काढणी यंत्र आणि मुक्त गोठा अशा दोन्ही योजनांच्या अनुदानासाठी तालुका नुसार लाभार्थी निवडण्यात आले आहेत. त्यानुसार अकोले तालुक्यात 13, जामखेड तालुक्यात 11, कर्जत तालुक्यात 17, कोपरगाव तालुक्यात 09, नगर तालुक्यातील 19, नेवासा तालुक्यात 19, पारनेर तालुक्यात 17, पाथर्डी तालुक्यात 14, राहता तालुक्यात दहा, राहुरी तालुक्यातील 19, संगमनेर तालुक्यात 22, शेवगाव तालुक्यात 12, श्रीगोंदा तालुक्यात 17 तर श्रीरामपूर तालुक्यातून 09 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. असे एकूण 208 शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा होणार आहे.

 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीदूध