चेतन धनुरे
धाराशिवसारख्या अवर्षणप्रवण व भाजून काढणाऱ्या तापमानातही वाढणारी निसर्गसंपदा पाहून कोणालाही हेवा न वाटले तरच नवल. येथील भाग्यश्री केसरकर यांनी आपल्या दोन-अडीच गुंठ्याच्या परसबागेत शेकडो प्रजातींची वृक्ष संपदा जपली आहे. (Successful experiment)
उगवत्या सूर्याच्या साक्षीने झाडांवर चालणारा पाखरांचा कल्ला, शीतल वाऱ्यासवे मोहरून डोलणारी फुलं, आपली धिप्पाड शरीरयष्टी सावरत लगडलेले फणस अन् फळाचे डोहाळे लागलेली पानांतून डोकावणारी सफरचंदाची फुले, चिक्कार फळांनी लगडलेले नारळ, आंबा, चिक्कू... हे निसर्ग वर्णन कोण्या कोकणातले नव्हे की काश्मिरातलेही. ४२ अंश सेल्सिअस तापमानात भाजून निघणाऱ्या धाराशिवातील हे दृश्य आहे.
रुग्णसेवेचे व्रत निभावतानाच येथील भाग्यश्री केसकर यांनी आपल्या परसबागेत लेकरांच्या मायेने वाढवलेली ही निसर्गसंपदा लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, या संत तुकारामांच्या अभंगाची अनुभूती भाग्यश्री केसकर यांच्या परसबागेतून येते. (Successful experiment)
घरातील एखाद्या आनंदमयी सोहळ्यासाठी जमलेल्या गोतावळ्याने फुललेले अंगण अन् या परसबागेत फरक तो काय? शासकीय रुग्णालयात वेगवेगळ्या शिफ्टमध्ये रुग्णसेवेत लीन असलेल्या केसकर या साहित्यिका, कवयित्री म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मात्र, यातही निसर्गवेड त्यांनी चांगलेच जपलेले आहे.
दोन-अडीच गुंठ्याच्या परसबागेत शेकडो प्रजातींची फळे, फुले, मसाला, आयुर्वेदीय महत्त्व असणारी वृक्षवल्ली त्यांनी चांगलीच बहरवली आहे. अगदी उणे तापमानात वाढणारे सफरचंद, चिक्कार पावसात जगणारा फणसही त्यांच्या अंगणी आनंदाने नांदताहेत.
धाराशिवसारख्या अवर्षणप्रवण व भाजून काढणाऱ्या तापमानातही बर्फाळ व भरपूर पावसाच्या प्रदेशात वाढणारी निसर्गसंपदा पाहून कोणालाही हेवा न वाटले तरच नवल. विशेष म्हणजे, या संपदेने तापमानही सरासरी ३ अंशांनी खाली येत आहे.
मसाले अन् आयुर्वेदिक औषधी
आयुर्वेदिक तुळस, रानतुळस, तेजपत्ता, कडीपत्ता, ऑल स्पाईसी, नागदौड, गवती चहा, कोरफड, पुदिना, ओवा, कलकत्ता पान, इन्सुलिन प्लांट, गुळवेल, रताळ्याच्या वेली, हळद, लवंग, विलायची, पानफुटी, लाजाळू, चंगेरी चांगलीच वाढली आहेत.
फळझाडांची सोबत...
केसकर यांच्या परसबागेत सफरचंद, केशर आंबा, बदाम आंबा, केळी आंबा, तोतापुरी आंबा, गावरान केळी, बदाम, रामफळ, अननस, तुती, पेंशनफ्रुट, फणस, डाळींब, नारळ, सरदार पेरू, रामफळ, सीताफळ, चेरी, स्ट्रॉबेरी, भुईअंजीर, अंजीर, मोसंबी, संत्री, जांभूळ आंबा, कालापत्ती चिकू, काजू, सीडलेस लिंबू, सुपारी, पपई आदी फळझाडे बहरली आहेत.
या झाडांमुळे शोभा
यलो-ग्रीन-पिंक स्पायडर, बाफना, पामट्री, पर्पल हार्ट, गोल्डन बांबू, बेबीक्राय, बेबीग्रास, सेक्युलंट, पिंकलिव्हज, मोरपीस, स्नेक ट्री, लैलामजनू, कॉसमॉस, श्रीलिव्हज, वेलवेट व्हाईट, स्नो-व्हाईट, हँगिंग वेली, मनीप्लान्ट, दुपारती, ग्रीन, रेड, व्हाइट गुड लक, बॉटल पाम शोभा वाढवताहेत.