Kadwa Sugar Factory : कादवा सहकारी साखर कारखान्याने (Kadwa Sugar Factory) प्रतिकूल परिस्थिती असतानाही गळीत हंगामाची यशस्वी सांगता होत ३,५२,५५७ मे. टन ऊसाचे गाळप करुन सरासरी १२.१४ टक्के उतारा मिळवत ३ लाख ९३ हजार ५०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. तर एप्रिल अखेर इथेनॉल प्रकल्प (Eathenol Project) सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यंदा दुष्काळी स्थिती असल्याने उसाची उपलब्धता कमी असल्याने त्यातच ऊस तोड मजूर टंचाईने (Us Tod Kamgar) राज्यातील सर्वच कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कादवाने १३० दिवसात गळीत हंगाम पूर्ण केला असुन गळीत हंगाम सांगता चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते गव्हानीत नारळ टाकून झाली. यावेळी बोलताना श्रीराम शेटे यांनी हंगाम यशस्वी यशस्वी केल्याबद्दल ऊस उत्पादक, कामगार, ऊस तोड कामगार, ऊस वाहतूकदार, मालपुरवठादार यांचे आभार मानत पुढील वर्षी जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
इतर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्याने मोठ्या प्रमाणात ऊस पळवापळवी होत त्याचा फटका छोट्या कारखान्यांना बसत आहे त्यामुळे कमी दिवसात जास्त गाळप करण्यासाठी कादवा कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी लागेल, असे सांगितले. ऊस लागवड वाढविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे उधारीने रासायनिक खाते इफको १०-२६-२६ वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी व कादवाला ऊस पुरवठा करावा असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.
एप्रिल अखेर इथेनॉल प्रकल्प सुरु असणार
कारखान्या तर्फे सभासदांना सवलतीच्या दरात दिली जाणारी साखरेची अंतिम मुदत बुधवार ३० एप्रिल असून त्यानंतर कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही. तरी आपली सवलतीच्या दरातील साखर कारखाना कार्यस्थळावरुन घेवून जावी असे आवाहन कादवा प्रशासनाने केले आहे. कादवाचे इथेनॉल प्रकल्पातून १३ एप्रिल अखेर ३९ लाख ४१ हजार ५५ लिटर इथेनॉल निर्मिती झाली असून एप्रिल अखेर इथेनॉल प्रकल्प सुरु असणार आहे.