Join us

Makar Sankranti 2024 : मकर संक्रातीला ऊस का पूजला जातो? हे आहे कारण

By गोकुळ पवार | Published: January 15, 2024 3:52 PM

मकर संक्रातीच्या दिवशी शेतातील पिकांचे महत्व ओळखून धनधान्याचं प्रतिक म्हणून पूजा केली जाते.

आज सर्वत्र मकर संक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नववर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रातीला मान दिला जातो. हाच काळ रब्बी हंगामाचा असल्याने या काळात हरभरा, ऊस ही दोन मुख्य पिके शेतात असतात. यांसह अन्य पिकांना घेऊन मकर संक्रातीला धन धान्यांची पूजा केली जाते. हरभरा आणि ऊस पिकाचे महत्व अनन्य साधारण आहे. 

भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अनेक वर्षांपासून भारत देशात कृषी संस्कृती रुजलेली आहे. म्हणूनच कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण- समारंभ साजरे केले जातात. यातील एक सण म्हणजे नववर्षातील मकरसंक्रांत सण होय. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. शिवाय हरभरा, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून पूजा केली जाते. 'सुघट' म्हणजे काय तर सुव्यवस्थित असलेला घड. याच घडात रब्बी हंगामातील शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवले जाते. यात धनधान्याचं प्रतिक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं. 

रब्बीचा हंगामात ऊस पीक बहरात येऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत असते. अनेक भागातील शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात असतो. यातून साखर निर्मिती केली जाते. त्यामुळे ऊसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. ऊस गोडवा देणारे पीक आहे. ज्यापासून साखर आणि गूळ निर्मिती केली जाते. म्हणूनच ऊसाला संक्रातीच्या पूजेत समाविष्ट केले जाते. यावेळी संक्रातीच्या आदल्या दिवशी अनेक शेतकरी आपल्या शेतीतील ऊस, उसाच्या पेऱ्या बाजारात घेऊन येत असतात. अशावेळी नागरिक देखील मोठया प्रमाणावर खरेदी करत असतात. मकर संक्रात सणच गोड बोलण्यावर निर्भर असल्याने ऊसाला महत्व दिले जाते. 

संक्रात गोडव्याचा सण मकर संक्रात हा मुळात गोडव्याचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी तिळगुळ वाटून तोंड गोड केले जाते. तसेच आजच्या दिवशी शेतातील पिकांचे महत्व ओळखून पूजेसाठी वापरले जाते. यात हरभरा, ऊस पिकाला देखील प्राधान्य दिले जाते. रब्बी हंगामात येत असलेल्या पिकांना महत्व दिले जाते. यात ऊस गोड म्हणून त्याचा वापर केला जातो. तसेच हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमकर संक्रांतीऊससाखर कारखाने