रविंद्र शिऊरकर
येवला : एकीकडे लाल कांद्याच्या बाजारभावात होत असलेली घसरण यामुळे शेतकरी हैराण आहेत. अशातच नाशिक जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ कांदा लागवड सुरु आहे. मात्र येवला तालुक्यात यावर्षी उन्हाळी कांद्याची अवघी २८-३० टक्के लागवड झाली असल्याने भविष्यात या परिसरात कांदा टंचाई निर्माण होण्याचे चित्र दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यास कांद्याची पंढरी म्ह्णून ओळखले जाते. विशेष लासलगाव, पिंपळगाव, येवला आदी भागात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असते. शिवाय लासलगाव, विंचुर, मनमाड, नांदगाव, अंदरसुल अशा पाच बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याची आवक होत असते. यात सर्वाधिक आणि मुख्य कांदा विक्रेता शेतकरी हा येवला तालुक्यातील आहे. कांदा उत्पादनात शेतकरी पावसाळी म्हणजे पोळ कांदा, लेट खरीप कांदा व उन्हाळी (रब्बी) कांदा असे तिन्ही प्रकारचे कांदा पीके घेतात. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जास्तीचा कल हा उन्हाळी कांद्याकडे अधिक असतो.
जुलै मध्ये अल्प पावसाने हजेरी लावली ज्यातून जेमतेम पिकं हाती आले. मात्र पुढे पडलेला पावसाचा खंड ज्यातून विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेली. परिणामी सध्याच्या घडीला तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांच्या विहिरीला अवघे पिण्यापुरते पाणी असल्याने कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. महत्वाचे म्हणजे यंदा दुष्काळी तालुक्यात येवला तालुक्याची नोंदही करण्यात आली आहे. येवला तालुक्यात २०२२-२३ मध्ये उन्हाळी कांद्याची २५२७८ हेक्टरवर लागवड झाली होती मात्र या वर्षी १५ जानेवारीच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या पीक पेरा अहवालानुसार आता पर्यँत अवघी ८२६७ हेक्टर लागवड झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी २८-३०% लागवड या वर्षी झाली असून यात या पुढे फार फार ५ टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला यांनी सांगितले.
पाणीच शिल्लक नाही....
येवला तालुक्यातील चांदगाव येथील शेतकरी गणेश गोराणे म्हणाले कि, माझे क्षेत्र अंकई किल्ला परिसरात चांदगाव हद्दीत आहे. पाऊस कमी झाल्याने सध्या कोणतेही पीक घेण्यास विहिरीत मुबलक पाणी नाही. त्यामुळे दर वर्षी ५ एकर उन्हाळी कांदा लागवड केल्या जाणाऱ्या शेतात यंदा मात्र एका कांद्याची हि लागवड झालेली नाही. खरिपात न मिळालेले अपेक्षित उत्पन्न उन्हाळी पीक काढेल हि आशा आता फोळ ठरली आहे.