Join us

Tadfal Fruit : ताडफळ खा, शरीरातील तापमान कमी करा, काय आहे फळाची वैशिष्ट्ये? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:25 IST

Tadfal Fruit :

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतशिवारात तसेच बोडीच्या व तलाव पाळीवर उंच उंच ताडवृक्ष दिसून येतात. साधारणतः एप्रिल महिन्यात ताडफळ लागवड (Palm tree) असते. या कालावधीत उन्हाळा असतो. त्यामुळे ताडफळ (Tadfal) खाण्याची इच्छा निर्माण होत असते. सध्या ताड प्रति नग ३५ ते ४० रुपये भावाने विकले जात असून यातून रोजगार उपलब्ध झाला आहे.

अहेरी उपविभागात (Gadchiroli District) तसेच चामोर्शी तालुक्यात झाडे मोठ्या ताडाची प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे, ताडफळ हे गारवा देणारे असून शरीरातील उष्णता कमी करते. ताड आरोग्यदायी असल्याने ताडाला मागणी वाढली आहे. गडचिरोली येथील बाजारात शंभर रुपयाला तीन ताडफळ विकले जात आहे.

ठाणे, रत्नागिरी, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ताडाची लागवड (Tad Lagvad) केली जाते. त्याला ताडगोळा वृक्ष असेही म्हणतात. ताड हा वृक्ष सुमारे ३० मीटर उंच वाढतो. खोडाचा घेर तळाशी २ मीटर असून तो राखाडी व दंडगोलाकार असतो. खोड मध्यभागी किंचित फुगीर असते. खोडाच्या जमिनीलगत असलेली अनेक फुगीर मुळे खोडाला घट्ट धरून ठेवतात. खोड लहानपणी वाळलेल्या पानांनी आच्छादलेले असते. तर मोठेपणी त्यावर पडून गेलेल्या पानांचे वण (किण) दिसतात. ताडफळ हे उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे व उपयुक्त असे फळ आहे.

विविध साहित्य बनविण्यासही उपयुक्तताडाचे खोड हे खांब, वासे व फक्या बनविण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी मऊ खोड पोखरून व नळीसारखे करून पाणी वाहून नेण्यासाठी वापरतात. पाने व खोडापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग झाडू, कुंचले, दोर बनविण्यासाठी करतात. ताडगोळे शामक व पौष्टिक असतात. नीरा उत्तेजक, थंड, मूत्रल आणि जीवनसत्त्वयुक्त पेय म्हणून प्रसिद्ध आहे.

अशी होते ताडाच्या झाडाची वाढसुरुवातीला ताडाची वाढ सावकाश होते. तर वय झाल्यावर ते भरभर वाढते. खोडाच्या टोकाला ३० ते ४० पानांचा झुबका असतो. पाने एकाआड एक, विभाजित व पंख्याच्या आकाराची असतात. पाते अर्धवर्तुळाकार १-१.५ मीटर रुंद, चिवट, चकचकीत व थोडेसे विभागलेले असते. फळ आठळीयुक्त, मोठे, गोल, करड्या व पिवळ्या रंगाचे असून त्यात एक ते तीन बिया असतात.

वाहतूक खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यापासून ताडफळ विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. ताड फळाला या दिवसात चांगली मागणी असते. एटापल्ली, मुलचेरा भागातून ताडफळ आणावे लागत असून वाहतूक खर्च वाढला आहे.- बिपीन मंडल, ताड विक्रेते.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीफळे