Join us

आता मोफत बियाणे वाटपाची योजना, असा घ्या लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:56 PM

चाऱ्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने वैरण विकास योजना आणली आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगाव, सिन्नर, येवला तालुका हे कमी पावसामुळे दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर झाले असून इतर पाच तालुक्यांत दुष्काळसदृश्यस्थिती आहे. या अशा परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चाऱ्याचे भाव 20 टक्क्यांनी वाढले असून, परिणामी पुढच्या महिन्यापासून दुधाच्या किमती वाढू शकतात. त्याची चाहूल आताच लागली आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने वैरण विकास योजना आणली आहे. या योजनेतून चाऱ्यासाठी मोफत बियाणे मिळत आहेत. 

सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चाऱ्याचे बियाणे लावावेत; अन्यथा पुढील वर्षीदेखील चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन त्याचा परिणाम दुधाच्या भाववाढीवर होऊ शकतो. जिल्हा परिषदेने वैरण विकास योजनेसाठी 30 लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. बहुवार्षिक मका बियाणे पुरविले जाते. एकूण पाच किलो मका पुरविला जातो. तसेच 100 ठोंबे पुरविले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांस आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, रेशनकार्ड आवश्यक असणार आहे.

चाऱ्याचा तुटवडा

यंदा पाऊस कमी झाल्याने चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे चारा महागला आहे. परिणामी दुधाच्या भाववाढीचा अंदाज आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने चाऱ्याची 25 टक्के तूट भासत आहे. चाऱ्याची तूट भरून काढण्यासाठी वैरण विकास योजना अमलात आली आहे. नाशिक जिल्ह्यात जिथे पाण्याचे प्रमाण मुबलक आहे, तेथे चारा उगवणारे मोफत बियाणे जास्त प्रमाणात दिले जात आहेत. दरम्यान चाऱ्याची टंचाई निर्माण होताच दूध उत्पादक संकटात सापडले आहेत. नाशिक शहरात रोज तीन लाखांहून अधिक लिटर दूध लागते. चारा टंचाई असल्याने गुरांना परिपक्च तसेच नैसर्गिक चारा कमीच मिळणार आहे. त्यामुळे डेपांची विक्री वाढेल अन् त्यामुळे ढेपांचेही दर वाढू शकतात. त्यामुळे दूधही महागल्या- शिवाय राहणार नाही, असा निष्कर्ष काढला जात आहे. 

40 हजार किलो बियाणे वाटप होणार 

जिल्हा परिषदेचे पशु संवर्धन अधिकारी संजय शिंदे म्हणाले की, वैरण विकास योजनेंतर्गत आतापर्यंत 80 हजार किलो बियाणे जिल्ह्यात वाटप केले आहे. अजून 40 हजार बियाणे वाटप होतील. चारा मुबलक असला तर दुधाचे भावही नियंत्रणात राहतील. मका, बाजरा, ज्वारी व न्यून्ट्रीफिडचे बियाणे दिले जात आहेत. रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन चायासाठी मोफत बियाणे घेऊन जावेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अमिषा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचे काम सुरु आहे. पुढील काळात चारा टंचाई निर्माण होणार नाही. 

टॅग्स :शेतीनाशिक