तापमान वाढत असल्याने अनेक पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे उन्हापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. वेलवर्गीय, भाजीपाला पिके त्याचबरोबर फळ पिकांना देखील धोका असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशा वाढत्या उन्हात डाळींब पिकासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राच्या माध्यमातून कृषी सल्ला देण्यात आला आहे.
वाढत्या उन्हाच्या झळापासून डाळींब पीक संरक्षित करण्यासाठी फळधारक झाडाच्या वयानुसार शिफारस केलेल्या शेणखताच्या मात्रेच्या १५० टक्के (१५ ते २० कि../ झाड) शेणखत द्यावे. शक्यतो सेंद्रिय आच्छादनांचा (उसाचे पाचट, करडईचा भुसा, कोरडे गवत इ.) अवलंब करावा. झाडाच्या वाढीसाठी संप्रेरके एन.ए.ए. १० पी.पी.एम. ची फवारणी फुलगळ कमी करण्यासाठी करावी. दुष्काळामध्ये झाडाची क्षमता वाढविण्यासाठी सॅलिसिलीक अॅसिड हे ३०० पी.पी.एम. या प्रमाणे फवारावे.
मॅग्नेशियम सल्फेट ६ ग्रॅली पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने फवारावे जेणेकरून प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारेल. नत्र युक्त खतांचा वापर शिफारस केलेल्या मात्रेच्या २५ टक्के वाढवावा. थायोयुरिया । ग्रॅ/ली किंवा पोटॅशियम नायट्रेट हे २.५ में/ली पाणी या प्रमाणात फवारणी केल्यास झाडामध्ये दुष्काळ सहन क्षमता वाढते. या महिन्यात सनस्कॅल्ड कमी करण्यासाठी केओलीन ५ टक्के ची फवारणी करावी. आवश्यक असल्यास १५ दिवसांच्या अंतराने २.५ टक्के प्रमाणे एक किंवा दोन अतिरिक्त फवारण्या घ्याव्यात.
यामुळे होईल सुधारणा
पॉलीप्रोपिलीन नॉन वृव्हन पिक आच्छदनांचा वापर केल्यास फळांचा रंग, दाण्यांचा रंग, फळातील रसाचे प्रमाण, इ. मध्ये सुधारणा होते. पिक आच्छदने झाड निहाय किंवा ओळी निहाय करता येणे शक्य आहे. यामुळे वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम टाळला येतील. तसेच अधिक माहिती आवश्यक असल्यास मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ पवन मधुकर चौधरी यांना देखील संपर्क करू शकता.
स्त्रोत- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर