Join us

उन्हाळ कांदा काढणी वेगात, मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:11 PM

सध्या कांद्याला असलेला कमी भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे.

नाशिक : सध्या कसमादे भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा काढणी सुरू केली आहे. सध्या कांद्याला असलेला कमी भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे. त्यातील काही कांदा मार्केटमध्ये आणला जात असला तरी पूर्णपणे कांदा साठवणुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सध्या अपेक्षित भाव नसल्याने तूर्तास कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल निर्माण झालेला दिसत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे या वर्षी कांद्याची कमी लागवड झाली होती. यावर्षी कांद्याला पोषक वातावरण असल्यामुळे शेतकऱ्याला कांद्याचे चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा असताना कांदा तयार होण्याच्या ऐन शेवटच्या टप्प्यात उन्हाच्या तापमानात अचानकपणे मोठी तीव्रता निर्माण झाल्याने विहिरींच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात घट झाली. त्याचा कांद्याला मोठा फटका बसला असून ३० ते ४० टक्क्यापर्यंत उत्पादन घटणार असल्याने उत्पादक कांदा साठवणुकीवर भर देत आहेत.

यावर्षी कमी पावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी साधेल असा कयास व्यक्त केला जात होता. सुरुवातीपासून चांगले वातावरण असल्यामुळे कमी पावसात देखील कांद्याचे पीक भरदार होते; मात्र फेब्रुवारीच्या अखेरीस गळिताच्या वेळी कांदा उत्पादक पट्ट्यातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीच्या झालेल्या घटीमुळे कांद्याला मोठा फटका बसला, त्यामुळे चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादन घटणार असल्याने चित्र आहे. त्याच बरोबर मार्च अखेरीस कांद्याला मिळत असलेल्या सरासरी हजार ते बाराशे रुपये भावामुळे केंद्र शासनाच्या एक एप्रिलनंतर देखील निर्यात खुली होणार नसल्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीवर भर देऊ लागला आहे.

साठवण करण्यास अधिक पसंती

मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या भऊरसह खामखेडा, सावकी, विठेवाडी, पिळकोस, बगडू, भादवण, विसापूर तसेच परिसरात कांदा साठवणूक करतानाचे सध्या चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. गिरणा नदीकाठच्या परिसरातील लोहोणेर, ठेंगोडा विठेवाडी. भऊर, सावकी, खामखेडा, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर खालप, वासोळ, महालपाटणे, सरस्वतीवाडी, माळवाडी या परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते

उत्पादनात घट 

फेब्रुवारी महिन्यातच गिरणा नदीचे दोन्ही पाणीपाळी एकाचवेळी सुटल्याने गेल्या महिनाभरापासून गिरणानदी कोरडी ठाक असल्याने नदीकात परिसरातील विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करत होता; मात्र यावर्षी उत्पादनातील घट, सध्या मिळत असलेला अल्पसा बाजारभाव व दुष्काळामुळे कांदा साठवणूक करण्यास भर दिला जात आहे.

सध्या कांद्याला मिळत असलेला अल्पसा बाजारभाव क अस्मानी संकटाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे घटलेल्या उत्पादनामुळे यावर्षी अनेक शेतकरी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर देत आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे दोन पैसा मिळेल अशी रास्त अपेक्षा मनाशी असल्याने शेतकरी यावर्षी मोठ्या अपक्षेने कांद्याची साठवणूक करत आहेत. - नानाजी आहिरे कांदा उत्पादक शेतकरी, लोहोणे 

टॅग्स :शेतीहवामानकांदामार्केट यार्डनाशिक