Join us

गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्तामुळे अनेकांना रोजगार, यंदा दुप्पट बोनस मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 8:35 PM

पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत.

गडचिराेली :गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता विक्रीतून प्राप्त हाेणारी संपूर्ण राॅयल्टीची रक्कम मजुरांना बाेनसच्या स्वरूपात वनविभागामार्फत वितरित केली जाते. नुकताच २४ तेंदूपत्ता युनिटचा लिलाव पार पडला आहे. त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट राॅयल्टी मिळणार असल्याने तेंदूपत्त्याचे संकलन करणाऱ्या मजुरांनाही यावर्षी दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

पूर्वी जिल्हाभरातील तेंदूपत्ता वनविभागामार्फत संकलित केला जात हाेता. मात्र पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. जे जंगल पेसा अंतर्गत येत नाही. केवळ तेथीलच तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार वनविभागाला आहेत. गडचिराेली जिल्ह्यात वनविभागाचे आता २५ युनिट आहेत. त्यापैकी २१ युनिटचा लिलाव १४ फेब्रुवारी राेजी झाला. तर तीन युनिटचा लिलाव २१ फेब्रुवारीला झाला. या सर्व युनिटच्या विक्रीतून वनविभागाकडे सुमारे ७ काेटी १२ लाख रुपयांची राॅयल्टी जमा हाेणार आहे. 

दरम्यान मागील वर्षी या २४ युनिटच्या विक्रीतून केवळ ४ काेटी रुपयांची राॅयल्टी मिळाली हाेता. यावर्षी राॅयल्टी दुप्पट झाल्याने बाेनसही दुप्पट मिळणार आहे. पेसा अंतर्गतही तेंदूपत्त्याचे संकलन केले जाते. मात्र, ग्रामसभांची अनेक कंत्राटदारांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे मजूर आता वन विभागाच्या मार्फत तेंदूपत्ता संकलनाकडे वळत आहेत.

३६ हजार ९०० बॅगचे उद्दिष्ट विक्री झालेल्या २४ युनिटमधून ३६ हजार ९०० स्टँडर्ड बॅग तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा वनविभागाचा अंदाज असतो. त्यामध्ये थाेड्याफार प्रमाणात कमीअधिक संकलन हाेऊ शकते. तसेच प्रती स्टँडर्ड बॅग (एक हजार तेंदूपत्त्यासाठी) किमान ३ हजार ९०० रुपये मजुरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंत्राटदार यापेक्षा अधिक मजुरी देऊ शकते. मात्र त्यापेक्षा कमी मजुरी देऊ शकत नाही. अन्यथा संबधित कंत्राटदारावर कारवाई केली जाते.

वाघाच्या भीतीने एक युनिट विक्री लांबली

वडसा युनिटमध्ये वाघ व हत्तींची दहशत आहे. परिणामी या युनिटची मागील वर्षी विक्री झाली नव्हती. यावर्षीही अजूनपर्यंत विक्री झाली नाही. आता २८ फेब्रुवारी राेजी लिलाव ठेवला आहे. या दिवशी तरी हा युनिट विकला जाणार की नाही, याकडे वनविभागाचे लक्ष लागले आहे. वाघाच्या दहशतीमुळे या जंगलातून तेंदूपत्ता संकलन करण्यास मजूर तयार हाेत नाही. त्यामुळे कंत्राटदार सदर युनिट खरेदी करीत नाही.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीगडचिरोलीशेतकरी