Join us

Tibak Anudan : ठिबक सिंचन केले, मात्र अनुदान दीड वर्षांपासून रखडले! वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:41 IST

Tibak Anudan : ठिबक सिंचन योजनेचे अनुदान दीड वर्षापासून रखडल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

जळगाव : राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान (Tibak Anudan) रखडल्याचे चित्र आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील १ हजार ४८० शेतकऱ्यांचे २०२३-२४ या वर्षाचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदान दीड वर्षापासून रखडल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

ठिबक सिंचन योजनेमुळे उन्हाळ्यात पिकांना (Unhali Pike) आवश्यकतेनुसार पाणी देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांचा फायदा होत असतो. मात्र, दीड वर्षांपासून तुषार सिंचन योजनेचे अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातून १९४२ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी (Tibak Sinchan Yojana) अर्ज दाखल केले. त्यापैकी अवघ्या ४५० शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले. उर्वरित शेतकऱ्यांना दीड वर्षापासून अनुदान मिळालेले नाही.

२ वर्षांपासून शेतात ४ एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केली आहे. या वर्षी कापसाची लागवड केली होती, परंतु २ वर्षांपासून ठिबक सिंचन अनुदान मिळाले नाही. अनुदानाबाबत वेळोवेळी कृषी अधिकारी कार्यालयात चौकशी केली असता, अनुदान येणार असल्याचे वेळोवेळी सांगण्यात आले.- दुर्गादास महाजन, शेतकरी, एरंडोल

शेतात ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केली असून अजूनही अनुदान प्राप्त झालेले नाही. ही योजना ऑनलाईन असून लॉटरी स्वरूपात नंबर लागल्यावर अनुदान देण्यात येईल, असे सांगण्यात आले. यावर्षी तुषार सिंचन योजनेद्वारे कापूस लागवड केली. मात्र बाजारमूल्य कमी झाल्याने संकट कोसळले आहे.- इच्छाराम गंगाराम महाजन, शेतकरी, एरंडोल

कृषी आयुक्तालयाकडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान अद्याप आलेले नाही. अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदानाच्या रकमा यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत.-जे. पी. गंभीरे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीठिबक सिंचन