Join us

Tibak Anudan : दीड वर्षे झाले अनुदान द्या ना हो साहेब, तुमचंही ठिबक अनुदान राहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 19:21 IST

Tibak Anudan : प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचे, ठिबक योजनेचे (Tibak Anudan)अनुदान २०२३-२४ पासून रखडले आहे.

जळगाव : प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचे (Tibak Anudan)अनुदान २०२३-२४ पासून रखडले आहे. या योजनेअंतर्गत एकूण २ हजार १११ प्रस्ताव कृषी विभागास प्राप्त झाले आहेत. यापैकी २ हजार १११ प्रस्ताव मंजूर झाले असून केवळ ६४५ शेतकऱ्यांना जिल्हास्तरावरुन ३ कोटी ३४ लाख अनुदानाचा लाभ मिळाला आहे. उर्वरित १ हजार ४६६ शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 

अनुदानाच्या चौकशीसाठी शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. दरम्यान, अजूनही या योजनेचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. ६४५ शेतकऱ्यांना जिल्हास्तरावरुन एकूण ३ कोटी ३४ लाखांच्या अनुदानाचा लाभ यापूर्वीच देण्यात आला आहे. हे पहिल्या टप्याचे अनुदान ५५ टक्क्यांप्रमाणे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहे. 

प्रलंबित १ हजार ४६६ ठिबक सिंचनचे प्रस्ताव स्पर्श प्रणालीद्वारे आयुक्तालय स्तरावरुन अनुदान वाटपाची कार्यवाही सुरु झाली आहे. प्रति शेतकरी ४५ हजार रुपये अनुदान मिळत असल्याची माहिती देण्यात आली. ५५ टक्के अनुदानाची रक्कम पहिल्या टप्यात तर फरकाची २५ टक्के अदा करण्याची कार्यवाही पुणे आयुक्त स्तरावरुन सुरु आहे. 

राज्याचा वाटा ४० टक्केशेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानापैकी केंद्रातर्फे ६० टक्के तर राज्यातर्फे ४० टक्के अनुदान दिले जाते. या योजनेत लाभार्थ्यांना पूरक सहाय्य अनुदान म्हणून मुख्यमंत्री सुरु आहे. हे अनुदान राज्य सरकारचे आहे. सन २०२४-२५मध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीसाठी लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ४० शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे.

१८ शेतकऱ्यांना फरकाची रक्कम केली अदा..!या ४० शेतकऱ्यांपैकी ३१ ठिबक संच बसविलेले आहेत. ३१पैकी १८ शेतकऱ्यांना २ लाख ७४ हजार रुपये एवढ्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गाची सूक्ष्म ठिबक सिंचन अनुदान निवडीसाठी सोडत निघालेली नाही.

प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचनयोजनेसाठी भडगाव तालुक्यातून २ हजार १११ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. यात २ हजार १११ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हास्तरावरुन पहिल्या टप्प्याचे ५५ टक्के म्हणजेच ३ कोटी ३४ लाख रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना यापूर्वीच वितरीत करण्यात आले आहे. प्रलंबित १ हजार ४६६ प्रस्तावांना स्पर्श प्रणालीद्वारे आयुक्तालय स्तरावरुन अनुदान वाटपाची कार्यवाही सुरु झाली आहे.- डिगंबर तांबे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, भडगाव

अनुदान द्या ना हो साहेब...!अनुदान केव्हा मिळणार? असा प्रश्न या शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत वारंवार कृषी विभागाकडे या शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. मात्र शासनाकडून अनुदान आलेले नाही. अनुदान मिळाल्यानंतर त्वरित ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल, असे सांगण्यात येत असल्याचे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रठिबक सिंचनशेती