Join us

Cotton Sowing : आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात कपाशीची लागवड किती झाली? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 5:41 PM

जळगाव : जूनमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Rain Update) नोंद झाली. मात्र दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे  आता पाऊस ...

जळगाव : जूनमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Rain Update) नोंद झाली. मात्र दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे  आता पाऊस चांगला होत असल्याने दि. २८ जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात ५४.३५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. त्यात कपाशीने सर्वाधिक क्षेत्र व्यापले असून त्याची टक्केवारी ६७.९६ इतकी आहे. शेतजमिनीत ओल असल्याने कपाशीची लागवड करण्याला प्राधान्य दिले जात आहे. नेमकी कोणत्या पिकाची किती पेरणी झाली आहे, हे पाहुयात.. 

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) मोठ्या प्रमाणात केळीसह कापूस (Cotton Cultivation) पिकवला जातो. तर एकूण पिकांसाठी जवळपास ४ लाख २२ हजार २ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यात ३ लाख ४० हजार ८४१ हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीसाठीचे आहे. त्यापाठोपाठ मक्यासाठी ५५ हजार ५३६ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या चार दिवसांत झालेल्या दमदार पावसानंतर या आठवड्यात पेरण्यांना वेग आला आहे. शेतशिवार शेतकऱ्यांसह मजुरांनी फुलले असून शेतजमिनीत ओल असल्याने कपाशीची लागवड करण्याला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात कपाशी, मका, तृणधान्याला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तिळीची लागवड अत्यल्प असून कडधान्यांची पेरणीही बऱ्यापैकी दिसून येत आहे.

पीकनिहाय क्षेत्र व झालेली पेरणी (टक्के)

पीक-क्षेत्र (हे)-पेरणी

ज्वारी-३०७५ क्षेत्र तर ०६.८८ टक्के पेरणी, बाजरी-२८६७ क्षेत्र तर १८.१८ टक्के पेरणी, मका-५५५३६ क्षेत्र तर  ५६.६६ टक्के पेरणी, इतर तृणधान्य-१७७५ क्षेत्र तर ८३.०६ टक्के पेरणी, तूर-७९६७ क्षेत्र तर १८.९१ टक्के पेरणी, मूग-४२४० क्षेत्र तर १५.०९ टक्के पेरणी, उडीद-३२५२ क्षेत्र तर १२.३६ टक्के पेरणी, इतर कडधान्य-१२४ क्षेत्र तर ११.५८ टक्के पेरणी, भुईमूग-४२३ क्षेत्र तर १४.१० टक्के पेरणी, सोयाबीन-३७२९ क्षेत्र तर १२.५९ टक्के पेरणी, कपाशी-३४०८४१ क्षेत्र तर ६७.९६ टक्के पेरणी अशी एकूण ४२२००३ क्षेत्रावर ५४.३५ टक्के पेरणी झाली आहे. 

टॅग्स :कापूसजळगावनागपूरपेरणीलागवड, मशागतशेती