Tomato Harvesting : सध्या टोमॅटोला अपेक्षित दर (Tomato Market) नसल्याचे चित्र आहे. आता पिंपळगाव पाठोपाठ गिरणारे टोमॅटो मार्केटही (Girnare Tomato Market) सुरु झाले आहे. आवक वाढली असून बाजारभाव समाधानकारक नाहीत. त्यातच नाशिकचा टोमॅटो पट्ट्यात काढणीच्या कामाला वेग आला आहे. यासाठी जवळपास कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ९०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. त्यामुळे बाजारभावापेक्षा दुप्पट मजुरी द्यावी लागत असल्याने शेतकरी हतबल आहेत.
नाशिक तालुक्यातील (Nashik) गिरणारे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. विशेषतः टोमॅटो लागवड (Tomato Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि याच ठिकाणी म्हणजेच गिरणारे गावात टोमॅटो मार्केट असल्याने ने आण करणे सोपे जाते. मात्र यंदा टोमॅटो काढणीलाच शेतकरी हतबल झाला आहे. एकीकडे ४०० ते ४५० रुपयांपर्यंत टोमॅटो कॅरेटला भाव आहे. दुसरीकडे हेच टोमॅटो काढणीसाठी तब्बल सहाशे ते ९०० रुपयांपर्यंत रोजची मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. त्यामुळे बाजारभाव आणि मजुरीचा दर हे गणित जुळेनासे झाले आहे.
सध्या द्राक्ष व टोमॅटो उत्पादक शेतकरी, सोयाबीन, मका काढणी यासाठी मजुरांची मागणी जोरात आहे. त्यामुळं आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मजुरांना चांगला रोजगार मिळत आहे. शेती हाच मजुरांना वर्षभर रोजगार देणारा व्यवसाय आहे. मात्र उत्पादन खर्चातील २५ ते ३० टक्के खर्च मजुरीवर खर्ची होत असल्याचे चित्र आहे. टोमॅटोला अपेक्षित भाव नसताना मजुरी मात्र दुप्पट द्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शिवाय मजुरांचा तुटवडा ही अडचण मोठी आहे.
टोमॅटो उत्पादक अडचणीत
त्यात सध्या गिरणारे पट्ट्यात टोमॅटो काढणी जोमात आहे. जवळपास रोज ३० हजाराहून अधिक शेतमजूरांना रोजचा रोजगार शेतकरी देतात. मात्र टोमॅटो ऐन दिवाळीत भाव उतरले असल्याने मजुरीने मात्र ऐन सणात ६०० ते ९०० रुपये रोज मजुरी घेतली जात आहे. यातून मिळणारे उत्पन्न व मजुरीचे सणात वाढलेले दर यामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत आला आहे. टोमॅटोला सध्या प्रति कॅरेट २५० ते ३५० पर्यंत भाव आहे, हा फार कमी आहे. - राम खुर्दळ, शेतकरी, गिरणारे