नाशिक : महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि आशियाई विकास बँक यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या मॅग्नेट (महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट) प्रकल्पामध्ये फलोत्पादन क्षेत्रातील संस्थांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात पायाभूत सुविधांचा विकास, प्रक्रिया उद्योगांची स्थापना यांचा समावेश आहे. याचाच भाग म्हणून नुकतेच ‘सह्याद्री फार्म्स‘ येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण 409 संचालकांना क्षमता बांधणीचे व काढणी पश्चात तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले.
सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन हे मॅग्नेट हे प्रकल्पासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून कार्यरत आहे. प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक आणि भागधारकांसाठी दोन महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या प्रकल्पांतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व मुल्य साखळी गुंतणूकदारांसाठी काढणी पश्चात व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जात आहे. यात डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, चिकू, पेरू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (लाल व हिरवी), फूले, पडवळ, काजू, आंबा व लिंबु या 15 फळपिकांचा समावेश आहे.
तर या प्रकल्पाच्या माध्यमातून क्षमता बांधणी हा कार्यक्रम शेतकरी उत्पादक संचालकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देतो. यामध्ये शेतकरी उत्पादकचे आर्थिक व्यवस्थापन, विपणन रणनीती, बाजारपेठेची उपलब्धता सुलभ करणे आणि शेतकरी उत्पादक च्या विकासासाठी आवश्यक असलेल्या इतर महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन केले जात आहे. काढणीपश्चात व्यवस्थापन तंत्रज्ञान हा कार्यक्रम पीक काढणी नंतर होणाऱ्या नुकसानीचा धोका कमी करण्यासाठी, प्रक्रिया उद्योगांची स्थापना, बाजारपेठेशी लिंक स्थापित करणे आणि निर्यातीच्या संधींवर प्रशिक्षण देतो.
महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्राला मजबूती देण्यासाठी....
तसेच क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या 8 बॅचेस पूर्ण झालेल्या असून 261 शेतकरी उत्पादक कंपनी संचालकांनी व भागधारकांनी यात सहभाग घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात मध्ये सुरू झालेल्या काढणीपश्चात व्यवस्थापन तंत्रज्ञान कार्यक्रमाच्या 4 बॅचेस पूर्ण झालेल्या आहेत आणि 148 प्रशिक्षणार्थी यात सहभागी झाले. दरम्यान एकूण या पुढील 2 बॅचेसमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, भागधारक आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्याच्या संचालकांमध्ये नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित होत आहेत. मॅग्नेट प्रकल्पाचे काढणीपश्चात व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रशिक्षण महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्राला मजबूती देण्यासाठी आणि त्याला अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
‘‘फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपनींच्या मूल्यसाखळी उभारणीसाठी सह्याद्री फार्म्स सोबत मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पीक काढणीपश्चात व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी.गुणवत्ता पूर्ण प्रक्रिया उद्योग उभे राहावे व यामाध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांची मूल्यसाखळी निर्माण व्हावी याकरिता आम्ही शेतकर्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.‘‘
-एस. वाय. पुरी, विभागीय प्रकल्प उपसंचालक, मॅग्नेट
‘‘या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला शिकण्याची संधी तर मिळालीच, मात्र याचबरोबर प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या चुका टाळता येतील आणि जास्तीत जास्त उत्पन्न निश्चित करता येणार आहे. आम्ही गुणवत्तापूर्णच उत्पादन करू हा विश्वास मला प्रशिक्षणामुळे आला आहे.‘‘- सायली देशमुख, प्रशिक्षणार्थी