Join us

Sesame Farming : उन्हाळ्यात तीळ पिकाला शेतकऱ्याची पसंती, एकरी तीन क्विंटलचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 2:00 PM

काही प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या पुढाकाराने उन्हाळी तीळ पीकाचे क्षेत्र वाढतीवर आहे.

सेवाग्राम वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्याला, वर्धा जिल्ह्यात तीळ उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तशीही मोजकीच, मात्र काही प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या पुढाकाराने उन्हाळी तीळ पीकाचे क्षेत्र वाढतीवर आहे. हमदापूर परिसरात अवळपास २५ एकरांत तिळाचा पेरा शेतकऱ्यांनी केला असून एकरी तीन क्विंटलपर्यंत उत्पादन होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात पारंपरिक पिकांमध्ये सोयाबीन, तुर, कापूस, चना आणि गहू ही पारंपरिक पिके घेतली जात आहेत. यात काही भाजीपाला घेणारे शेतकरीही आहे. शेतकरी हा प्रयोगशील असला, तरी निसर्ग आणि बाजाराची साथ त्याला मिळाल्यास तो बारमाही व्यावसायिक शेती करायची तयारी ठेवतो, पण प्रत्येक ठिकाणी नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने, नवीन पीकाकडे वळण्याचे धाडस शेतकरी करीत नाही.

दरम्यान हमदापूर पट्ट्यातही सोयाबीन, तूर, कापूस, चना व गहू हिच पारंपरिक पद्धतीची पिके घेतली जातात. काही शेतकऱ्यांनी हिंमत करून उन्हाळी सोयाबीनचे पीक घेतले. तीन ते चार वर्षे हा प्रयोग चालला, पण यात फायदा कमी नुकसान अधिक झाल्याने सोयाबीन न पेरण्याचा निर्णय घेतला. पाण्याची सुविधा असल्याने धाडस करून उन्हाळी तीळ पिकाची लागवड केली. यात खर्च वजा होता नफा शिल्लक पडत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून तीळाचे पीक घेतले जात आहे. यात वर्षागणीक पीकक्षेत्र वाढत आहे. पीक समाधान कारक असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी सांगितला आहे. हमदापूरमध्ये 25 एकरांत तीळ असून आता सोंगणी सुरू आहे. तीळ वजनाला हलके असून तीन क्विंटलच्या वर होत असल्याची माहिती आहे. तीन ते साडेतीन महिन्यांचे पीक असून में मध्ये खरीप हंगामासाठी शेतीची मशागत होऊन जात असल्याने शेतक-यांसाठी फायद्याचे असल्याचे दिसून येत आहे.

मी पहिल्यांदाच साडेचार एकरांत तीळ पेरले आहेत. बाजारात दहा ते पंधरा हजार क्विंटल असा भाव असून वीस क्विंटल होण्याचा अंदाज आहे. वातावरणाने साथ आणि पाण्याची व्यवस्था व नियोजन केले, तर पीक फायद्याचे वाटते.

- पंकज कळसकर, शेतकरी हमदापूर.

तीन वर्षांपासून मी तीळ पीक घेत असून समाधानकारक उत्पन्न होत आहे. या अगोदर सोयाबीनचा प्रयोग फसला, पण यात मात्र बऱ्यापैकी उत्पादन होत असून भावही चांगला मिळतो. दोन एकरांतील तिळाची कापणी सुरु आहे.

- रामेश्वर अमनेरकर, शेतकरी हमदापूर.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रवर्धाशेतकरी