- भूषण रामराजेनंदुरबार : जीआय मानांकन असलेली तूरडाळ आणि भात (Rice Farming) पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या नवापूर तालुक्यात आजही पारंपरिक पद्धतीने शेती करणारे असंख्य शेतकरी आहेत. यात गेल्या अनेक पिढ्यांपासून सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक भात अर्थात ब्राऊन राईस बियाण्याची (Rice Seed) जपणूक केली जात आहे. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेल्या या अनोख्या अशा या तांदळाच्या वाणांचे केवळ नवापूर तालुक्यात उत्पादन घेतले जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) एकूण ४८ हजार हेक्टरवर पेरणी होणाऱ्या भातापैकी १६ हजार हेक्टर भात हा नवापूर तालुक्यात घेतला जातो. तालुक्यात प्रामुख्याने लावणी पेक्षा पेरणी (Rice Sowing) पद्धतीने भात घेण्यावर भर दिला जातो. तालुक्यात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी १ हजार मिलीमीटर पाऊस कोसळत असल्याने भात पिकाच्या पोषणासाठी शेतकऱ्यांना वातावरण मिळत होते. परिणामी तालुक्यात भाताची पेरणी जिल्ह्यात सर्वाधिक होते. यात गेल्या काही वर्षात पारंपरिक वाण सोडून हायब्रिड वाणांना पसंती देत शेतकरी दोन पैसे कमाविण्यावर भर देत होते. परंतु पावसाची अनियमितता आणि हायब्रीड तांदळाला मिळणारा मातीमोल भाव यामुळे नवापूर तालुक्यात 'जुनं ते सोनं' या उक्तीला धरून शेतकरी पुन्हा पारंपरिक भात पेरणीकडे वळले आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडे गेल्या पाच वर्षात पारंपरिक भात बियाण्याचा साठा वाढला आहे. यंदाही शेतकरी बियाण्याची देवाणघेवाण करत क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करत असल्याच सांगण्यात येत आहे.
हे आहेत पारंपरिक वाणकाबरा डुला, चिरली, लाल कडा, काळ डांगर, हलकी, राती हाल, उन्हाळी गुडा हे पारंपरिक भाताचे वाण आहेत. शेतीचा अविष्कार झाल्यापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या वाणांचा प्रसार सुरू झाला असे तालुक्यातील जाणकार शेतकरी सांगतात. कुळीद या तृणधान्याच्या काड्यांपासून तयार झालेल्या शेणाने सारवलेल्या कोठीमध्ये या बियाण्याचा साठा केला जातो. साधारण १२० दिवसाच्या पारंपरिक भाताच्या पिकाचे एकरी तीन क्विंटलपर्यंत उत्पादन येते. नवापूर तालुक्यात बहुतांश शेतकरी आंतरपीक म्हणून भाताची पेरणी करतात. शरीरासाठी पोषक असलेला हा तांदूळ पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर उत्पादित केला जातो. कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत दिले जात नाही. सेंद्रिय खतही केवळ शेणखत दिले जाते. या वाणातील काही वाण हे बाहेर आणि आतून काहीसा तपकिरी आणि लाल असतो. पोषक घटक असलेला हा तांदूळ नवापूर तालुक्यातून काही प्रमाणात निर्यात केला जातो. सध्या तालुक्यात १ हजार पेक्षा अधिक शेतकरी ब्राऊन राईसची शेती करतात.
सामाजिक एकात्मता टिकवण्याचेही माध्यमपारंपरिक अशा या बियाणांची जपणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी सध्या साखळी पद्धतीने पेरणी सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बियाणे नसेल त्याला पायलीच्या हिशोबाने पेरणीसाठी बियाणे दिले जाते. उत्पादन आल्यावर पुढील वर्षी हा शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला बियाणे देईल. अशा पद्धतीने या वाणांचा प्रसार करण्यात येत आहे. नवापुरातील भाताच्या या बियाणांतून येणारे उत्पादन प्रामुख्याने घरीच ठेवले जाते. वर्षानुवर्षे घरीच ठेवला जाणारा हा तांदूळ सामाजिक मनोमिलनाचेही प्रतीक बनला आहे. आदिवासी समुदायात एखाद्याला जेवणावळीसाठी तांदळाची गरज भासल्यास हा तांदूळ देऊन सहाय्य करण्याची परंपरा नवापूर तालुक्यात आहे. पचनाला हलका असल्याने त्याची मागणी वाढत आहे.
काबरा डुला, चिरली, लाल कडा, काळ डांगर, हलकी, राती हाल, उन्हाळी गुडा, भोवाड्या हे तांदळाचे वाण पिढ्यांपासून आदिवासी समुदायाकडे आहेत. आदिवासी क्षेत्रात हे वाण मिळू शकतील. यांत्रिक आणि रासायनिक शेतीमुळे त्यांचे क्षेत्र कमी झाले आहे. परंतु नवापूर तालुक्यात मात्र या वाणांची जपणूक केली गेली आहे. १०० टक्के सेंद्रीय तांदळाची शेती ही केवळ नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी करत आहेत. - रशिद गावित, प्रयोगशील शेतकरी, धनराट ता. नवापूर