Join us

Tur Cultivation : यंदा राज्यात १ लाख हेक्टरने तुरीचे क्षेत्र वाढले, मागील वर्षी किती होतं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 6:36 PM

Tur Cultivation : तर यावर्षी राज्यात याच तारखेपर्यंत १२ लाख ११ हजार ९४१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे.

वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) राज्यात तुरीचे क्षेत्र वाढले आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार गतवर्षी २१ ऑगस्टपर्यंत ११ लाख ५ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावर तर यावर्षी याच तारखेपर्यंत १२ लाख ११ हजार ९४१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात १ लाख ६ हजार ६२० हेक्टरने तुरीचे क्षेत्र वाढले आहे. 

राज्यात वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षात सरासरी १२ लाख ९५ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी (tur Sowing) झाली होती. तथापि, या काळात तुरीला अपेक्षित असे दर मिळू शकले नाहीत. त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीकडे पाठ फिरविली होती. परिणामी गतवर्षीही राज्यात ११ लाख ५ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावरच तुरीची पेरणी झाली होती. राज्यात तुरीचा पेरा घटला असतानाच देशांतर्गत साठाही कमी झाला होता. त्यामुळे तुरीची मागणी वाढली आणि तुरडाळही १७० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. 

अशातच गतवर्षी तुरीला चांगले दर मिळाले. शासनाने तुरीला गतवर्षी ७ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे हमीभाव घोषित केले असताना बाजार समित्यांत तुरीला १३ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळू लागले होते. सध्याही राज्यात तुरीला ११ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळत आहेत. बाजारात तुरीला मिळत असलेले दर आणि इतर पिकांचे वारंवार होणारे नुकसान लक्षात घेत शेतकऱ्यांनी तुरीच्या पेरणीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे क्षेत्र १ लाख ६ हजार ३२० हेक्टरने वाढले आहेत.

तुरीची पेरणी अमरावती विभागात सर्वाधिक

सर्वाधिक पेरणी अमरावती विभागात राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत अमरावती विभागात तुरीची पेरणी अधिक होते. या विभागात खरीप हंगामात सोयाबीननंतर सर्वाधिक तुरीचीच पेरणी शेतकरी करतात. यंदाही इतर विभागांच्या तुलनेत अमरावती विभागात तुरीची पेरणी सर्वाधिक झाली आहे. या विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून ४ लाख ३९ हजार ९८२ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. 

टॅग्स :पेरणीलागवड, मशागततुराशेती क्षेत्रशेती