Join us

Crop Management : अमरवेलचा बंदोबस्त कसा कराल, 'हे' दोन उपाय ठरतील फायदेशीर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 7:22 PM

Weed Management : अमरवेलचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी हे दोन उपाय फायदेशीर ठरतील, बघा कोणते?

वर्धा : 'तण खाई धन' या उक्तीनुसार विविध तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान शेतकऱ्यांना माहितीच आहे. याच मालिकेतील 'अमरवेल' हे तण सर्वसाधारणपणे (Weed Management) आढळणाऱ्या तणांशी साधर्म्य साधणारे नसून प्रादुर्भावाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्याचे वेगळेपण सिद्ध होते. या परोपजीवी तणाचे योग्य वेळी प्रभावी नियंत्रण करण्यासाठी या तणाची जीवशास्त्रीयदृष्ट्या माहिती करून घेणे आवश्यक आहे.

अमरवेल वनस्पती (Amarvel) कंदमुळे वर्गातील, पर्णहीन पिवळसर रंगाची असून तिच्या सुमारे १७० प्रजाती आहेत. हे तण पूर्ण परोपजीवी असल्यामुळे उपजीविकेसाठी द्विदल पिकांवर पूर्णतः अवलंबून राहते. परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकांसोबत द्विदल तणांवर (तरोटा, रेशीमकाटा, गोखुरू, हजारदानी, बावची आदी) देखील स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करते. अलीकडे विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर (Soyabean) या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. त्याचप्रमाणे मूग, उडीद, कपाशी, हरभरा, जवस, कांदा तसेच मिरची पिकावर देखील अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन पिकाखालील लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे, सोयाबीन पिकातील विविध तणांच्या व्यवस्थापनासाठी तणनाशकांचा वापर प्रभावी ठरत आहे. 

असे करा व्यवस्थापन

अमरवेल तणाच्या प्रभावी व्यव- स्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात सामूहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक, निवारणात्मक उपाय तसेच रासायनिक पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१ प्रतिबंधात्मक उपाय

पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणवि- रहित बियाण्यांचा वापर करावा. पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. विशेषतः शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून अथवा जाळून नष्ट करावा. कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहतो. प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ करूनच त्याचा पुन्हा वापर करावा.

२ निवारणात्मक उपाय

मशागतीय पद्धत...

जमिनीची खोल नांगरणी करावी, बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने ८ सें.मी. पलीकडे अमरवेलीची उगवण होत नाही. जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. नियमित डवरणी व निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे. पिकांची फेरपालट करावी, प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी. अमरवेल ८-१० दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे यजमान पिकांची लागवड तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यानंतर ८-१० दिवसांनी करावी.

रासायनिक व्यवस्थापन :

सोयाबीन, भुईमूग, कपाशी, तूर, कांदा, मिरची या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक, पेन्डिमिथेलीन (३८.७ टक्के सी.एस.) ३० ते ३५ मि.ली. प्रती १० लिटर पाणी (एकरी ७०० मि.ली. प्रती २०० लिटर पाणी) याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रपीक व्यवस्थापन