नाशिक : जिल्हा परिषद सेस फंड योजनेतंर्गत ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे (Tur Seed) पंचायत समितीकडुन मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बियाणे आवश्यक असल्यास त्यांनी आजपासुनच पंचायत समिती कृषि विभागात बियाणे मागणी अर्ज भरून द्यावे, असे आवाहन पंचायत समितीमार्फत (Nashik Panchayat Samiti) करण्यात आले आहे. संबंधित योजनेचे अर्ज पंचायत समिती कृषि विभागात उपलब्ध आहेत.
अशी आहे प्रक्रिया
शेतक-यांचा मागणी अर्ज विहीत नमुन्यात घेण्यात यावा. अर्जासोबत स्वताचे कुटुंबाचे नांवे असलेले ७/१२ व ८-अ चे अद्यावत उतारे सादर करणे आवश्यक आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त १ हेक्टरसाठी आवश्यक बियाण्याचा लाभ देण्यात यावा. (सदर बियाणेचा लाभ देताना एका पेक्षा अधिक बियाणेचा क्षेत्र मर्यादेत लाभ देय आहे.)
दुबार लाभ नाही...
अनुसुचीत जाती जमाती, अपंग व महिला शेतकरीसाठी शासनाने निर्धारीत केल्याप्रमाणे लाभ देण्यात यावा. प्राधान्य क्रम उरवितांना अनु जाती/अनु. जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक व वनपट्टेधारक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात यावे चालु आर्थिक वर्षात लाभ दिलेल्या शेतक-यांना दुबार लाभ दिला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर योजना हि सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात (खरीप रब्बी उन्हाळी हंगाम) मध्ये राबविण्यात यावी, योजनेसाठी आवश्यक बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ सातपूर, नाशिक या शासन अंगीकृत संस्थेकडून मंजुर दराप्रमाणे बियाणे खरेदी करुन पुरविण्यात येणार आहे.
५० टक्के अनुदानावर बियाणे
योजनेत ५० टक्के अनुदानावर तूर, मुग, उडीद, भुईमुग व हरभरा बियाणे देण्यात यावे. उर्वरीत ५० टक्के वसुल करावयाची रक्कम गटस्तरावर बियाणे वाटप करणेपुवी शेतकऱ्यांकडून वसुल करुन पुरवठादार संस्थेच्या नावे डी डी धनादेश काढून या कार्यालयास पाठविण्यात यावा. अनुदानाचे प्रस्ताव गटस्तरावर संपुर्ण कागदपत्रांसह दप्तरी ठेवावेत. वाटप रजिस्टर अद्यावत ठेवण्यात यावे. बियाणे वाटप केल्यानंतर तसेच पेरणी झाल्यानंतर कृषि अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषि) यांनी १०० टक्के क्षेत्रीय तपासणी करुन त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे.
बियाणे आणि त्यांची किंमत
या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ नाशिक यांच्याकडून हे बियाणे पुरवण्यात येत आहेत. यात तूर बियाण्याची दोन किलोची बॅग असून तिची किंमत 420 रुपये आहे। तर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर देण्यात येत असल्याने ती केवळ 210 रुपयाला मिळणार आहे. मूग बियाण्यांची 02 किलोची बॅग 450 रुपयांना असून शेतकऱ्यांना किंवा 225 रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर उडीद बियाण्यांची दोन किलो ची बॅग असून ती 380 रुपयांना असून यापैकी शेतकऱ्यांना केवळ 190 रुपये भरावे लागणार आहे. तर भुईमुगाची 20 किलोची बॅग असून 3200 रुपयांना आहे. शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 1600 रुपयांना मिळणार आहे.