Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitaraman) या थोड्याच वेळात म्हणजेच ११ वाजता संसदेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमन या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प (Budget 2024) मांडणार आहेत. १ फेब्रुवारी २०२४ नंतर या वर्षात येणारा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थ संकल्पातून शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत. ते पाहुयात...
विशेष म्हणजे अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी (Agriculture Budget) विविध घोषणा होण्याची शक्यता आहे. विविध नवनवीन योजनांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना नेमकं काय हवं आहे, पाहणे महत्वाचे आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी अर्थ संकल्पातून तरतूद केली पाहिजे, आजच्या अर्थसंकल्पातून अशा पद्धतीचे शेतकरी हित जपले जातेय का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करा...
या बजेटमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादनासाठी सवलती दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे कांदा निर्यात बंदी कायमस्वरूपी हटवली पाहीजे. निर्यातीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल. पिकांचे उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या घटकांवर जीएसटी आकारला जातो, तो बंद केला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात चांगला दर्जेदार माल तयार करून चांगले उत्पन्न होऊन आर्थिक फायदा होईल. शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत. इतर सवलती दिल्यापेक्षा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यावर लक्ष दिले पाहिजे. - संजय साठे, कांदा उत्पादक शेतकरी
कृषी विषयक योजनांचे व्यवस्थापन गरजेचे
द्राक्ष निर्यातीसाठी चालना देणे आवश्यक असून शेतकऱ्यांची हितासाठी निर्यातशुल्क कमी करणे गरजेचे आहे. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या विविध नकली प्रॉडक्टचा बाजारात सुळसुळाट आहे. शासनाने याकडे गांर्भीयाने लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे प्रॉडक्ट असतील, ते चांगल्या प्रकारचे मिळतील. शिवाय अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग पाहत आहेत, मात्र योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अशावेळी स्थानिक पातळीवर शास्रज्ञ उपलब्ध करून देणे, कृषी विभागाचा अधिकाधिक सहभाग असणे आवश्यक आहे. तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून या शेतमालाला भाव द्यावा, शासनाच्या कृषीविषयक योजना व्यवस्थित राबविल्या गेल्या पाहिजेत, स्थानिक पातळीवर काम करणे आवश्यक असून यासाठी वेगळ्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. - दिनकर कांबळे, द्राक्ष उत्पादक शेतकरी
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय हवंय
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कांदा चाळ, शंभर टक्के अनुदानावर मुख्यमंत्री सौ कृषी पंप योजना, शेतकऱ्यांकडे स्टोर वाढविण्यासाठी उपापयोजना आवश्यक आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर कांदा चाळ उभारणीसाठी आवश्यक निधी उभारण्याची गरज आहे. कारण ज्यावेळेस कांदा निघतो, त्यावेळेस शेतकऱ्यांना कांदा स्टोरेज करण्यास जागा नसल्यामुळे कमी भावात तो विकावा लागतो. त्याच वेळेस उत्पादन होत असल्याने, मागणी पुरवठा हे गणित सुद्धा विस्कळीत होत असते. सरकारने मूल्य स्थिर करण निधी अंतर्गत करोडो रुपयाचा बफर स्टॉक करून ठेवतात, त्यापेक्षा शेतकऱ्यांना मजबूत करण्याची गरज आहे, त्यानंतर सरकारला बफर स्टॉक करण्याची गरज नाही. शिवाय खते बी बियाणे यांना अनुदान उपलब्ध करून उत्पादन खर्च कमी करावा. - निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष बळीराजा शेतकरी उत्पादक गट