'क्या बोलू भैय्या', गावं मे खेती है मगर पैसो कि दिक्कत है.. इसलिये महाराष्ट्र मे काम के लिए आना पड रहा है,... हे वाक्य आहे, नाशिकमधील अंबड परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीत मजुरीसाठी ठेकेदाराची वाट बघत उभा असलेल्या युपी बिहारच्या तरुण शेतकऱ्याचे . नाशिक शहरातील सातपूर अंबड येथील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर युपी बिहार येथील कामगार आजही आहेत. यात तरुण शेतकऱ्यांची संख्या अधिक असून शेतीला जगविण्यासाठी घर सोडून परराज्यात येऊन काम करणे भाग असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.
नाशिक जिल्ह्यात सातपूर, अंबड, सिन्नर आदी परिसरात विविध कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये स्थानिकांसह मोठ्या प्रमाणावर बाहेरी राज्यातील तरुण वर्ग रोजंदारीवर आहे. अंबड आणि सातपूर या दोन्ही औद्योगिक वसाहती महत्वपूर्ण मानल्या जातात. या वसाहतीमध्ये परप्रांतीय तरुणांची मोठी संख्या पाहायला मिळते. तर हे मजूर उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यातील असून यात बहुतांश तरुणांची संख्या अधिक दिसून येते. यात नाक्यावर उभे राहून ठेकेदाराची बघत मजुरीवर जाणाऱ्यांची संख्याही पाहायला मिळते. याच तरुण आणि काही इतर मजुरांशी चर्चा केली असता बहुतांश मजुरांच्या घरी शेती असल्याचे जाणवले. मात्र भांडवल नसल्याने शेतीकडे फारसे लक्ष दिले जात नाही, शिवाय पिकांना बाजारभाव सुद्धा नाही, या कारणास्तव अनेक शेतकरी मजुरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये आल्याचे समोर आले.
यातील अनेक मजुरांशी संवाद साधला. या संवादातुन अनेक पैलू उलगडले. त्यात महत्वाचा पैलू म्हणून शेतीची अवस्था. यावर अनेक मजुरांनी आपले मत मांडत महाराष्ट्रापेक्षा तिथल्या शेतीची अवस्था कशी बिकट झालीय यावर भाष्य केले. यातील उत्तर प्रदेश येथून आलेले गेल्या काही महिन्यापासून नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले धर्मराज जैस्वाल म्हणाले की, घरची शेती असून इकडे मजुरीसाठी यावं लागतंय. तिकडे मजुरी सुद्धा कमी मिळते. त्यामुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत नाही. परिणामी इकडे अधिकचा रोज मिळत असल्याने शेतीसाठी भांडवल देखील इथूनच सोडवलं जातंय. अशा पद्धतीने शेती करणं सुरु आहे. मात्र तिकडे मालाला भाव नाही. त्यामुळे पिकाच्या उत्पन्नातून आर्थिक उन्नती दूरच पण भांडवल सुद्धा मागे पडत नसल्याचे जैस्वाल म्हणाले.
शेती जगविण्यासाठी मजुरी
तर उत्तर प्रदेशातील तरुण असलेले परवेज चौधरी म्हणाले, आमच्याकडे गहू, मोहरी, तांदूळ, कांदा, बटाटा, ऊस आदी पिके घेतली जातात. मात्र प्रामुख्याने गहू आणि तांदूळ ही दोनच मुख्ये पिके आहेत. कारण इतर पिके घेण्यासाठी भांडवल असणं आवश्यक आहे. तसेच अगदी कमी शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, तर काही शेतकऱ्यांकडे विजेची सुविधा नाही. अशा कारणांमुळे बाराही महिने शेती करणे जिकिरीचे होते. परिणामी शेतीसाठी कुणाकडून पाणी घ्यायचे असल्यास जेवढे पाणी भरल्यास, तेवढे पैसे देणे आवश्यक असते. अशावेळी सामान्य शेतकरी पावसाळी पिके घेऊन, घरातील सदस्यांना शेतीकडे लक्ष देण्यास सांगून इकडे कंपन्यांकडे रोजंदारीने येत असतात. इकडे मजुरीही चांगली मिळते, शेतीचे भांडवल पाठवले की, आवश्यक तेवढी शेती कुटुंबाबतील इतर सदस्य पाहत असल्याचे परवेज यांनी सांगितले.
शेतीच्या सुविधा उपलब्ध
तर गेल्या वर्षभरापासून नाशिकमध्ये राहत असलेला बिहार येथील मोहम्मद म्हणाला की, आमच्या भागातील शेतकऱ्यांपेक्षा इथला शेतकरी सुखी आहे. शासनाकडून अनेक योजनांचा लाभ इथल्या शेतकऱ्यांना मिळतो असतो. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजेच वीज, पाणी हे उपलब्ध आहे. शासनाच्या योजनांमुळे शेतीमध्ये विविध बदल करता येत आहेत. वेगवगेळ्या पद्धतीचा वापर शेतीसाठी केला जात आहे. त्याचबरोबर इथं पिकाला शेतकऱ्यांना समाधानकारक असा भाव मिळतो आहे, या सर्व गोष्टी असल्याने आमच्या येथील आणि इथल्या शेतकऱ्यांमध्ये बराचसा फरक दिसून येतो. परिणामी आमच्या सारख्या तरुणांना मजुरीसाठी परराज्यात याव लागते, अशी खंत मोहम्मद याने बोलून दाखवली.
हे चित्र बदलणार का?
एकूणच नाशिकमध्ये औद्योगिक वसाहती मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. दुसरीकडे यात युपी बिहारहून येणाऱ्या मजुरांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. त्या राज्यामध्ये शेतीत फारसा बदल झाला नसल्याचे वास्तव मजुरीवर येणाऱ्या तरुणांनी सांगितले. त्या उलट महाराष्ट्रात अलीकडच्या शेतीत प्रचंड बदल होऊन तरुण शेतकरी वाढत आहे. नवनव्या पद्धतीचा अवलंब शेतीत केला जात आहे. परिणामी शेतीतुन आर्थिक उन्नती साधली जात असल्याचे चित्र आहे. हेच चित्र युपी बिहारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना अशा पद्धतीने कुटुंबाला वाऱ्यावर सोडून परराज्यात रोजंदारीवर नाही यावं लागणार....