Join us

Organic Farming : शेतकऱ्यांनो! कडुनिंबाच्या निंबोळ्या साठवून ठेवा, वाचा शेतीसाठी काय फायदे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 4:02 PM

घरगुती निंबोळी अर्काचा वापर पिकांवर केल्यास शत्रूकिडींपासून रक्षण होणे शक्य आहे.

वाशिम : आगामी पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याअनुषंगाने खरीप हंगामही तोंडावर असून कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि भाजीपाला या पिकांवरील मित्रकिडींचे संरक्षण आणि शत्रूकिडींचे निर्मूलन करण्यासाठी निंबोळी अर्क 'संजीवनी बुटी' प्रमाणे कार्य करतो. सध्या कडुनिंबाच्या झाडाला निंबोळ्या लदबदल्या असून त्या पावसाळ्यापूर्वी तोडून साठवणूक करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

कडुनिंबाच्या झाडाला लागलेल्या निंबोळ्या गोळा करून वर्षभरासाठी साठवून आवश्यकता पडेल,तेव्हा त्यापासून घरगुती निंबोळी अर्क तयार करता येतो. या अर्काचा वापर पिकांवर केल्यास शत्रूकिडींपासून रक्षण होणे शक्य आहे. पर्यायाने खर्चात बचत होण्यासह पर्यावरणाचे संतुलन साधण्यास देखील मदत होते. शेत परिसरातील कड्डुनिंबाच्या झाडाच्या पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा कराव्यात. साल व गर काढलेल्या निंबोळी बिया सावलीत कोरड्या जागी सुकवायला ठेवाव्यात.

निंबोळीमध्ये कोणते घटक आणि अर्काचा फायदा काय? 

निंबोळीमध्ये अॅझाडिरॅक्टीन, निबीन, निबीडीन, निंबोनीन, निबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल असे अनेक रासायनिक घटक समाविष्ट असतात. हे घटक पिकांवरील किड नियंत्रणात मोलाची भूमिका पार पाडतात. त्याच्या वापराने मित्रकिडींचे आणि पर्यावरणाचे संवर्धन होण्यासह शत्रूकिडींचा नायनाट होणे शक्य आहे. तर पिकावरील पानांवर निबोळी अर्काची फवारणी केल्याने पाने कडू होतात. किडी अशी पाने खाणे टाळतात. किडीची उपासमार झाल्यामुळे शेवटी त्या मरतात. निंबोळी अर्काच्या कडू वासामुळे कीड पिकाजवळ येत नाही.

कसा तयार कराल निंबोळी अर्क?

सावलीत सुकवलेल्या 5 किलो  निंबोळ्या कुटून बारीक करून घ्याव्या. फवारणीच्या आदल्या दिवशी ही पावडर 1 लीटर पाण्यात रात्रभर भिजत घालावी. सकाळी ते द्रावण गाळून घ्यावे. अर्कात 90 लीटरपर्यंत पाणी मिसळावे. 1 लीटर पाण्यात 200 ग्रॅम धुण्याची पावडर किंवा साबण चुरा भिजत घालावा. हे द्रावण अन्य नऊ लीटर पाण्यात मिसळून साबण चुऱ्याचे द्रावण तयार करावे. दुसऱ्या दिवशी निबोळीचा अर्क व साबण चुऱ्याचे 10 लीटर द्रावण एकत्र करावे.

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मुग, भाजीपाला या पिकांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यास किडरोगांपासून पिकाचा बचाव करता येणे शक्य आहे. यासंदर्भात जिल्ह्यात सर्वत्र जनजागृती केली जात आहे.- आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :शेतीखतेसेंद्रिय शेतीशेती क्षेत्र