चंद्रपूर :महाराष्ट्रात ज्या भागात भात लागवड केली जाते, त्या भागात पेरणीच्या अनेक पद्धती प्रचलित होत्या. 'पोटोंडी' ही त्यापैकीच एक पद्धत. बियाण्यामध्ये उगवण क्षमता ( Seed Germination) आहे की नाही हे तपासून बघण्याची 'पोटोंडी' ही पद्धत दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत चांगलीच प्रचलित होती. मात्र, सध्या या पद्धतीचा कोणीच अवलंब करत नसल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीत धानपट्टयात आवते व पन्हे भरण्याचा हंगाम सुरू झाला आहे. पण शेतकरी पोटोंडी पद्धतीचा अवलंब करत असल्याचे दिसून येत नाही. कृषी केंद्रांवरून बियाणे (seed) घेतले की, सरळ शेतावर नेत असून, लगेच आवते आणि पन्हे भरणी शेतकरी करत आहेत. पोटोंडी टाकण्याची एक पद्धत होती. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर शेतकरी आवते आणि पन्हेच्या जागेची अगोदर मशागत करायचे. नंतर पावसाला सुरुवात झाली की, घरीच साठवून ठेवलेल्या बियाण्यांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पोटोंडी या पद्धतीचा उपयोग व्हायचा. पण आता काळ बदलला आहे.
शेतीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला आहे. घरीच तयार केलेले बियाणे साठवून ठेवण्याची पद्धत जवळपास बंद झाली आहे. त्याऐवजी कृषी केंद्रांमधून तयार बियाणे घेऊन त्यांचेच आवते व पन्हे टाकण्याची पद्धत रूढ झाली आहे. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांची फसगत होते. कृषी केंद्रांमधून खरेदी केलेले बियाणे उगवलेच नाही, अशा तक्रारी अनेकदा कानावर येत असल्या, तरी शेतकऱ्यांनी पोटोंडीकडे पाठ फिरवली आहे.
काय आहे पोटोंडी पद्धतपोटोंडी पद्धतीत साठवून ठेवलेल्या बियाण्यांमधून ओंजळभर धान्य काढून ते कापसाच्या बोळ्यामध्ये टाकले जायचे. नंतर हा बोळा छोटी टोपली किंवा पानांपासून बनवलेल्या द्रोणात ठेवला जायचा. त्याला आवश्यकतेनुसार पाणी देण्यात येत होते. चार- पाच दिवसांत या धान्याला अंकूर आले नाहीत तर या बियाण्यांमध्ये उगवण क्षमता नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात यायचे आणि लगेच हे शेतकरी दुसऱ्या बियाण्यांची तजवीज करायचे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर टळायचे, त्याचबरोबर नंतर उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करून वेळेवर हंगामही करता यायचा.