प्रदीप बोडणे
गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) वैरागड ही मोठी नगरी होती. याचे संकेत गावाच्या सीमावर्ती भागात असलेल्या विहिरी देतात. वैरागड गाव परिसरात जुन्या १०० विहिरी असून म्हणून शंभर विहिरीचे गाव, अशी ओळख वैरागड या गावाची आहे. आजही इथल्या चौकाचौकात या विहिरी इतिहासाची साक्ष देत आहेत.
साेळाव्या शतकातील हातीगुंफा शीलालेखात वैरागडचा उल्लेख ‘वज्रागर’ असा आढळतो. पूर्वी या ठिकाणी हिऱ्याची खाण होती. हिऱ्याच्या खाणीला वज्रागर म्हणत. त्याचा अपभ्रंश होऊन वैरागड असे नाव पडले. त्यावेळेस चंद्रपूर (चांदा), वैरागड व राजनांदगाव ह्या मोठ्या बाजारपेठा होत्या. वैरागड गावाच्या परिसरात जवळपास १०० विहिरी (Village Of Wells) आढळून येतात. या सगळ्या विहिरी मजबूत धाटणीच्या हे विशेष..!
ऐतिहासिक किल्ल्याच्या (Historical Fort) आंतरभागात वेगवेगळ्या आकाराच्या पाच विहिरी आहेत. ग्रा.पं. चौकातून दृष्टिक्षेप टाकल्यास मच्छी पालन संस्थेजवळ एक विहीर, राऊत पाटील यांच्या शेतात दुसरी, पेंदाम यांच्या घराजवळ तिसरी, शंकर मंदिराच्या बाजूला चौथी, जनार्दन बरडे यांच्या घराजवळ पाचवी, शामराव बावनकर यांच्या घरामागे सहावी, बोडणे यांच्या घरासमोर सातवी, विलास तागडे यांच्या घराजवळ आठवी, राजू मेश्राम घरासमोर नववी, अजय नवहाते यांच्या घराजवळ दहावी विहीर आहे. प्रत्येक चौकात आठ-दहा विहिरींची मोजदाद होते.
कलाकुसरीवरून वैभवाची साक्ष
वैरागड गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे होते हे म्हणायला विहिरींचा मजबूत आधार आहे. कारण गावा शेजारी माळी समाजबांधवांच्या भाजीपाला उत्पादनाच्या प्रत्येक वाडीत (शेत) हमखास विहिरी आहेच. कालांतराने काही विहिरी खचल्या, काही लोकांनी स्वतःच्या मालकीच्या म्हणून बुजवून टाकल्या आणि अनेक विहिरी काळाच्या ओघात नष्ट झाल्या असल्या तरी शंभर आकडा गाठेल एवढ्या विहिरी होत्या. त्यापैकी बऱ्याच आजही कायम आहेत. विहिरींची मजबूत धाटनी, बांधकामातील रेखीवपणा बघितल्यानंतर त्या काळातील कलाकुसरीची साक्ष पटते.