Join us

Vamandada Kardak : शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल गाण्यांतून मांडणारे महाकवी वामनदादा कर्डक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 10:43 AM

Vamandada Kardak : शेतकऱ्यांच्या घामाचे मोल वामन दादांना समजू लागले. खेड्या खेड्यात त्यामुळे वामन दादांचं गाणं पोहोचलं. वामन दादा प्रतिभा संपन्न महाकवी होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतच दलित चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक दलित शाहिरांनी आंबेडकरी चळवळीलावाहून घेतले. आद्य जलसा कार शाहीर भीमराव कर्डक असेच एक खरे लोककवी होऊन गेले. बाबासाहेबांना प्रेरणास्थानी मानून  वामनदादा झपाटल्या गत आंबेडकरी चळवळी सोबतच शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गिरणी कामगार, खाण कामगार, ऊस तोडणी कामगार यांच्या कथा -व्यथा गीता तून मांडू लागले. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल वामन दादांना समजू लागले. खेड्या खेड्यात त्यामुळे वामन दादांचं गाणं पोहोचलं. वामन दादा प्रतिभा संपन्न महाकवी होते. 

 

तळागाळा तील कष्टकरी जनता आणि शेतकऱ्यांविषयी त्यांनी जे विचार ४० च्या दशकात आपल्या कविता आणि शाहिरीच्या माध्यमा तून जनमानसापर्यंत पोहोचविल्या त्याला तोड नाही. आजही त्यांची शेतकऱ्यांविषयीची गीतं किती प्रासंगिक आहे, याची प्रचिती येते. शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन दादांनी जवळूनअनुभवले आणि जाणीव झाली, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तरीही तो उपेक्षित, कुणालाही सहज लुटता येणारा साधाभोळा प्राणी. या शेतकऱ्यांच्या कथा- व्यथा त्यांच्या कवितां मधून आजही प्रासंगिक आहेत.

वामनदादा लिहितात,‘मी खपून खातो, कोंड्याची भाकर,ती गमे तुम्हाला तूप आणि साखर,मी मरमर मरतो, माझ्या शेतावरते लुटून नेता, भरता आपली घरं.’

पुढे वामनदादा असे म्हणतात,‘आकाश फाटलं, हे रान पेटलं,सावकार शाहीनं, माझं घर लुटलं.'

उजाडण्या पूर्वीच शेतात जाऊन पिकाचे रक्षण करीत कासराभर दिवस वर येताच, न्याहारी घेऊन येणार्या पत्नीची वाट पाहतो. या भाऊक प्रसंगाचं वामनदादा अत्यंत विलोभनीय वर्णन करतात,‘राणी रानात लगबगीनं घाईघाई जाई,राजाला घेऊन न्याहारी.’लसणाची चटणी, बाजरीच्या भाकरी,लोणच्याची फोड पालवात बांधून आणलेल्या अशा न्याहारीची अविट गोडी चाखताना राजा- राणीच्या घामानं आजूबाजूचं भरात आलेलं पीक पाहून वामन दादांच्या शब्दांत शेतकरी म्हणतो,‘हिरवं कंसाळ रान, चमके मोत्या समान.शेत सोन्याची खाण, नाही कसलीच वाण,गहू, हरबरा, मकेचा तुरा, आणिक मोहरी,भुईमूग दाटलाय भारी नाचतो या शाळू शेजारी.’

स्वतः बरोबर सार्याची काळजी वाहणारा शेतकरी खर्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे.

वामनदादा म्हणतात,‘भोळा शेतकर्या चा जीव, करी दुनियेची कीव,दया माया त्यालाच, भुकेल्यांची जाणीव,तोच सर्वांना खाऊ घालतो भाकरी,कनवाळू राजा उपकारी.’..जगातील सार्या प्राणि मात्रांवर माया करणारा शेतकरी, आपल्या काळ्या शेतीलाच काळी माय मानून तिची मशागत करतो. शेतातील उभे पीक पाहून सुखावताना वामनदादा, त्यांचे मनातील भाव गीतात वर्णन करतात,‘नवं हे नव्हाळीच शेत हे गव्हाळीचं,शेजारी पीक डोले साळीचं.देणं हे माय माझ्या काळीचं.’

शेतकऱ्यांच्या या भाव स्पर्शीय क्षणाला स्वरूप देताना वामनदादा म्हणतात,‘धरणीमाते तूच माझे केले संगोपन,माउली तुला आधी वंदन.गगन वरूनी धरतो छाया,मेघ वर्षूनी लावी माया,सुखवी मजला वायुराया.रवी दाखवी पथ चालाया.परी ते लहरी कधी कधी तेकरती मज बंधन,माउली तुला अभि वंदन.’..याच काळ्या मातीत घाम गाळताना आम्हीच आमचे धनी आणी चाकर आहोत. आम्ही आमच्याच कष्टावर जगतो. शेतकऱ्यांचा हा दृढ निश्चय वामनदादा काव्यबद्ध करतात,धरणीची लेकरं आम्ही धरणीची लेकरं,घाम गळतो धरणी वर,तोच भरतो आमची घरं,खातो कष्टाची भाकर.ना चिंता कसली मनी,आम्हीच आमचे धनी.आमचेच आम्ही चाकर,आम्ही धरणीची लेकरं.’गावातील साऱ्या स्तरातील विविध जाती -धर्मा च्या कष्टकरी महिला जेव्हा एकत्र येऊन निंदणी, खुपणी, रोपणी करतात, तेव्हा खर्या अर्थानं त्याशेतकऱ्याच्या शेतात राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव अनुभवाला येतो. काही वर्षांआधी, ‘चल माझ्या सर्जा- राजा’ अशी बैलांना साद घालीत मोट हाकणारा शेतकरी व वाफ्या वाफ्यात पाणी वळवून पिकांना पाणी देणारी मोटकऱ्याची अर्धांगिनी, माळ्याच्या मळ्यातील हे जिवंत मनमोहक दृश्य आता इतिहास जमा झालेलं आहे. त्या दृश्यावर वामन दादांनी लिहिलेल्या काव्य पंक्ती,‘मोट हाकीतो राजा,राणी देई पिकांला पाणी,हिरव्यारानी.’या गीतातील पुढच्या ओळी वामन दादांच्या उत्तुंग काव्य प्रतिभेची साक्ष देतात. लेकुरवाळी माता आपल्या तान्हुल्यास मायेच्या कुशीत जिवापाड जपते. तशी गव्हाच्या कवळ्या ओंबीचं वर्णन करताना दादा म्हणतात,‘सळसळत्या कोवळ्या पानी,कोण्या लेकुरवाळी वानी,कवळी ओंबी जणू जोजवी,कुशीत आपली तान्ही हिरव्या रानी.’..शेतकऱ्याच्या पदरी सुखा दुःखाचे प्रसंग येत राहतात. कधी नापिकी, कधी भरपूर पीकपाणी. अशा प्रसंगाला सामोरे जात, शेतकरी तग धरून उभा आहे.तो घाम गाळतो. धान्याची कोठारे भरतो, त्याच्याच शेतातील शेतमालाचा भाव दुसराच ठरवतो. त्याच्या कष्टामुळे बिर्ला- बाटा मोठे झाले. ही जाणीव शेतकर्याला होताच, तो हक्काचा वाटा मागू लागतो. त्याचा विद्रोह वामनदादा गीतातून मांडतात,‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा,टाटा कुढाय हो.सांगा धनाचा साठा अन्आमचा वाटा कुढाय हो.

सत्ताधाऱ्यांना व प्रस्थापितांना रोखठोक सवाल करीत, शेतकरी आता पुढे सरसावला. त्याची कैफियत वामनदादा व्यक्त करतात...‘ठायीठायी थेंब सांडले आमच्या घामाचे,कधी न कोणी मोल मोजले आमच्या घामाचे,सुपीक सारे शेत शिवारी आम्हीच करणारे,कष्टाने कोठार धान्याचे आम्हीच भरणारे.’..सरकार कुणाचेही येवो, शेतकऱ्याच्या पदरी मात्र निराशाच असते. तो चोहोबाजूने नाडला जातो. त्याच्या जिवावर मात्र राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण खेळले जाते. तो उपाशी असतो, उपेक्षित असतो, मदतीच्या प्रतीक्षेत असतो. नापिकीने त्रस्त असतो, तरीही दुर्लक्षित असतो. अशा स्थितीत वामनदादा त्याचे दुःख पोट तिडकीने, परंतु उपरोधिक पणे मांडताना म्हणतात,

शेतकऱ्यांनो, कामकऱ्यांनो,गाळुनी घाम करा मरणाचं काम,नाही आराम नाही मागायचं दाम.पोटाची भानगड काढायची नाही,कुलूपे लावा तोंडास.शेतकऱ्यांनो, कामकऱ्यांनो,..येथील शेठ- सावकार जणू देवाघरून आले. तुम्ही मात्र त्यांचे गुलामा सारखे केवळ भाकरी वर किती दिवस राबणार? का तुम्ही फक्त कष्ट करीतच राहणार?आपल्या हक्कासाठी केव्हा भांडणार?..दादा म्हणतात,' शेठ आणि सावकार भलं भलं,देवाजी ची सख्खी मुलं,तुम्ही त्यांचे गुलाम चाकर,भाकरी वरती राबायचं.शेतकऱ्यांनो, कामकऱ्यांनो,.’..प्रखर उन्हाळा संपताच शेतकऱ्याच्या भावीआयुष्याला कलाटणी देणारा मृगाचा महिना सुरू होतो. पाऊस येईलच, या आशेने शेती पेरली आहे. मात्र, पावसा अभावी पिके सुकू लागली. आभाळा कडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली. आभाळा कडे डोळे लावून तो विनवणी करतो,..पावसांच्या धारांनो या,करपलेल्या पिकाला नवजीवन द्या...शेतकऱ्यांचे हे हतबल भाव विश्व दादा गीता द्वारे व्यक्त करतात,‘या थुई थुई थुई थुई धारा,हा शिवार फुलवा सारा,उगवा मोत्याचा चारा गं साजणी,सूर्यानं केली करणीकरपवली सारी धरणी,या करा पुन्हा नवतरणी गं साजणी.’..दुसऱ्या एका गीतात मेघराजाला साकडे घालताना वामनदादा म्हणतात,‘मेघराजा तू सांग आता का रे कोपला.करुणेचा साठा सांग आता का रे लोपला,दया येऊ दे दयाळा गळू दे आभाळअश्रू आपले ढाळ, कोटी कोटीजपती ही माळ कोटी कोटी.’..शेतकऱ्याच्या जीवनावर अशा कितीतरी हृदय स्पर्शी गीत रचना वामन दादांच्या आहेत. अशी अनेक गीते उपलब्ध असून, आजमितीस फक्त वामन दादांच्या गीतातील शेतकरी महिमा या विषयावर लिहिलेल्या गीतांचा हा शब्दप्रपंच.-

संकलन : शाहीर डी. आर. इंगळे 

टॅग्स :शेती क्षेत्रनाशिकशेतकरीशेती