गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटलांच्या मानधनाबाबतच्या प्रश्नावर अखेर सरकारने तोडगा काढला आहे. आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्री मंडळ बैठकीत पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आता १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
पोलिस पाटील पद शासन यंत्रणेतील गाव पातळीवरील महत्त्वाचा घटक मानला जातो. गावातील तंटे मिटविण्याचे महत्वपूर्ण काम, गावात शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. त्यामुळे पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून मानधनाबाबत अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत. अनेक नेते मंत्री यांना निवेदने दिली आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने अखेर मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पोलिस पाटलांना 6 हजार 500 रुपये मानधन देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून हे मानधन 15 हजार रुपये दरमहा करण्यात आले आहे.
पोलीस पाटील नेमकं काय काम करतात?
पोलीस पाटील गावातील अतिशय संवेदनशील कामे करतात, २४ तास त्यांना गाव सोडून कुठेही जाता येत नाही. गावात कायदा, सुरक्षितता आणि शांतता राखण्याचे काम त्यांना करावे लागते. गावातील वाद मिटविणे, गाव तंटामुक्त करणे, दंगे, बलात्कार, खुन, बालविवाह, गावातील नदी, नाले तलाव आदी ठिकाणी मृत्यु अशा घटनांची पोलीस ठाण्यात जावून पोलिसांना खबर द्यावी लागते. अनेकदा अपघाताची माहिती देण्यासाठी दुर अंतरावरील पोलीस ठाण्यात स्वखर्चाने जावे लागते.