गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचा प्रश्न अद्यापही लाल फितीत अडकून आहे. निर्यात खुली करूनही अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकरी हैराण आहे. अशात राज्यात देशात लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त कारण्यासाठी कांद्याची माळ घालून मतदान केले आहे.
सध्या देशभर आणि राज्यभरात लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु असून विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज महाराष्ट्रातील बहुतांश मतदार संघात मतदान पार पडत असताना अहमदनगर जिल्ह्यात एका मतदाराने गळ्यात कांद्याची माळ घालू मतदान केले. आज जळगावसह, अहमदनगर, पुणे आदींसह अकरा जागांवर मतदान होत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरु असून मतदानाच्या वेळी चोपडा येथे गळ्यात कांद्याची माळ घालून शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी संदीप पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात देखील मतदान सुरु असून अशातच श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथेही असाच प्रकार घडला. शेतीमालाच्या बाजारभावासंदर्भात शेतकर्यांमध्ये रोष असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केव्हा घेणार असा सवाल शेतकरी करीत आहेत. टाकळी लोणार येथील कांदा उत्पादक शेतकरी सोमनाथ गोडसे, संदीप कुंनगर यांनी कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क बजावला.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील कांदा उत्पादक शेतकरी त्रिंबक भदगले यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर जात मतदान केले. यावेळीं मतदान केंद्रावर केंद्रावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी कांद्याला व दुधाला भाव नसल्याने सरकारचा निषेध केला. तर सहा दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या दिवशी शेतकरी संघटेनचे पदाधिकारी असलेल्या शिवाजी नांदखिले यांनी कांद्याची माळ गळ्यात घालत आपल्या परिवारासोबत मतदान केले.