वर्धा : पावसाळ्यात (rainy season) येणाऱ्या अनेक रानभाज्या पौष्टिक असून आरोग्यासाठी चांगल्या राहतात. मात्र, नव्या पिढीतील अनेकांना या भाज्यांबद्दल माहितीच नाही. यातील अंबाडीची भाजी (Ambadichi Bhaji) मोठी चविष्ट असून तिची भाजी व भाकरीसुद्धा खूप रुचकर लागते. ठेचा आणि अंबाडीची भाकरी एवढे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. प्रामाणिकपणे सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) उत्पादन घेणारे हे शेतकरी व्यवसायापेक्षा सेवाभाव जास्त जोपासतात.
सेलू तालुक्यातील (Wardha District) सुरगाव येथील सेंद्रिय शेती करणारे अल्पभूधारक शेतकरी प्रवीण देशमुख यांनी शेतातील अंबाडीची भाजी घेत वर्धेला आर्वी नाका परिसरात नियमित सायंकाळी सहा ते आठ विक्रीसाठी दुकान लावून बसतात. सेंद्रिय भाजी असल्याने जाणकार लोक गर्दी करतात. एक पावाची जुडी ते फक्त दहा रुपयाला विकतात. ते शेतात विविध प्रकारचे सेंद्रिय पीक घेतात. सेंद्रिय भाजीपाल्याचीही लागवड करतात. अंबाडीच्या भाजीची ग्राहकाकडून मोठी मागणी असल्याने त्यांनी यंदा शेतात अंबाडीची लागवड केली. त्यासोबतच चवळी, मका, याचीही लागवड केली आहे. अत्यंत परिश्रमाने तयार केलेली ही अंबाडीची भाजी ते स्वतः मोटरसायकलने आर्वी नाका परिसरात नेऊन स्वतःच विक्रीसाठी दुकान लावतात. इतरही भाजीपाला ते त्याच पद्धतीने विकतात. ग्राहक त्यांच्या सेंद्रिय भाजीची वाट पाहत असल्याचे दिसून आले आहे.
अंबाडीच्या भाजीची मागणी जास्त
जुन्या पिढीतील शेतकरी ही भाजी आवडीने शेतात लावायचे. आंबट स्वाद असलेली ही भाजी अत्यंत रुचकर आहे. बदलत्या काळात नवनव्या भाज्याचे उत्पादन होत असल्याने अंबाडीची भाजी मिळणे दुरापास्त झाले. देशमुख हे सेंद्रिय पालक, मेथी, कोथिंबीर, मुळा, पालक, चवळी, कांदा, भुईमूग असे थोडे थोडे पीक घेतात. त्यांच्याकडे विश्वासाने ग्राहक येतात. सेंद्रिय अंबाडीच्या भाजीची खूप मागणी असल्याने त्यांनी ग्राहकांच्या आग्रहास्तव यावर्षी अंबाडीची भाजी लावून लोकांची आवड पूर्ण केली.
राष्ट्रसंतांच्या विचाराचे ते प्रसारक
प्रवीण देशमुख हे राष्ट्रांत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे प्रचार व प्रसारक आहेत, ते सप्त खंजिरीच्या माध्यमातून प्रबोधन करतात. त्यांनी सूरगाव येथे रंगाविना धूलिवंदन उपक्रमाची मागील २४ वर्षापासूनची परंपरा कायम ठेवली. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला त्यांनी सर्वस्व मानून जीवनात यातूनच सेंद्रिय शेतीचा ध्यास धरला. प्रवीण देशमुख यांना प्रवीण महाराज देशमुख म्हणून ओळखतात, परंतु त्यांना महाराज म्हणणे आवडत नाही, ते मी हाडाचा शेतकरी असल्याचे अभिमानाने सांगतात.