Join us

गाळमुक्त अभियानाची यशस्विता! गंगापूर धरणाची पाणी क्षमता 2 कोटी लिटर्सने वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:52 PM

गंगापूर धरणातून मागील चौदा दिवसात 21 हजार 623 क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

नाशिक : गंगापूर धरणालगत गंगाव-हे गाव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची तब्बल २ कोटी १५ लाख ८८ हजार लिटरने पाणी क्षमता वाढली आहे. आतापर्यंत १७५० हायवा ट्रक व १९९ ट्रॅक्टरच्या माध्यमातून तब्बल २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला असून, पुढील १५ जूनपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.

जलसमृद्ध नाशिक अभियानांतर्गत भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थांच्या पाठबळाच्या आधारे ही मोहीम राबविली जात असून १४ व्या दिवशी १६२ हायवा ट्रक व ८ ट्रॅक्टर माती काढण्यात आली. जवळपास १९६८ क्युबिक मीटर गाळाचा १४ व्या दिवशी उपसा करण्यात आला. धरणातून काढलेला गाळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोफत दिला जात असून, यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, या मोहिमेसाठी शहरातील सर्वच प्रमुख संस्था, संघटना आणि फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, त्यासाठी आर्थिक साहाय्य दिले आहे.

जून महिन्यापर्यंत गाळ काढण्याची मोहीम

ही मोहीम जिल्ह्यातील अन्य धरण, तलाव, गाव तळे येथे देखील राबविली जाणार आहे. जूनपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असल्याने, मोठ्या प्रमाणात धरणांची पाणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, ही मोहीम नाशिककरांसाठी असल्याने, नाशिककरांनी देखील यात सहभागी होण्याची गरज आहे. या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ लागणार असल्याने, प्रत्येक नाशिककरांनी शक्य होईल तितक्या प्रमाणात आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले जात आहे.

नाशिक जिल्ह्यात ‘जलसमृध्द नाशिक’ अभियान

यंदा सर्वदूर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर धरणातील पाणी पातळी देखील कमालीची खालावली आहे. अशा स्थितीत आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे गरजेचे असल्याने नाशिक जिल्ह्यात ‘जलसमृध्द नाशिक’ अभियान राबवण्यात येत आहे. साधारण १६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. गंगापूर धरण गाळमुक्त करून शंभर लाख लिटरने त्याची क्षमता वाढवण्याचा संकल्प मृद व जलसंधारण विभागाने केला आहे.

टॅग्स :नाशिकशेतीगंगापूर धरणधरणपाणीकपात