यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती ओढवली असल्याने राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने देखील पाण्याचे नियोजन करण्याचे संबंधित विभागाला दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातही दुष्काळ सदृश्य परिस्थिति असल्याने दिंडोरी तालुक्यातील पालखेड डाव्या कालव्यावरील शासनमान्य पाणीपुरवठा योजना आणि प्रासंगिक आरक्षणातील गावांनाच पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणात पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे चालू वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती, धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने दिंडोरी तालुक्यातील पालखेड डाव्या कालव्यावरील शासनमान्य पाणीपुरवठा योजना व प्रासंगिक आरक्षणातील गावांनाच 25 मार्च ते 9 एप्रिल, 2024 दरम्यान पालखेड डाव्या कालव्याद्वारे/नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
दरम्यान या प्रासंगिक आरक्षणामध्ये येवला नगरपरिषद येवला, मनमाड नगरपरिषद मनमाड, येवला तालुक्यातील 38 गांवे पाणीपुरवठा योजना, येवला तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायत, मध्य रेल्वे मनमाड, काकासाहेब वाघ साखर कारखाना, रानवड, ता. निफाड या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना व कादवा नदीवरील दिंडोरी तसेच निफाड व येवला तालुक्यातील प्रासंगिक आरक्षणातील गावांचा समावेश आहे.
पाण्याचा अनधिकृत उपसा करु नये
पालखेड डावा कालव्याचे माहे मार्च/एप्रिल २०२४ च्या बिगर सिंचन आवर्तनाच्या पूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर आवर्तन हे बिगर सिंचनाचे असल्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिक/शेतकरी यांनी पाण्याचा अनधिकृत उपसा करु नये. अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर प्रचलित शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.