अझहर शेख
नाशिक : जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्याचे निसर्ग वैभव असलेल्या पहिल्या रामसर स्थळाचा मान मिळालेल्या नांदूरमधमेश्वर अभयारण्यातील पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. गोदावरी नदीत सोडले जाणारे शहरी भागातील सांडपाण्याचा लोंढा अभयारण्यात येऊन मिसळतो. यामुळे जलप्रदूषण वाढीस लागत आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेत मलनि:सारण केंद्रातील यंत्रसामुग्री अधिकाधिक अद्ययावत करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
नांदुरमधमेश्वर अभयारण्य हे नाशिकमधील महत्त्वाचे पाणथळ आहे. या पाणथळाचा दर्जा राखण्यासाठी वन, वन्यजीव विभागासह महापालिका व जिल्हा प्रशासनालादेखील प्रभावी प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथील जलचर जैवविविधतेला धोका निर्माण झाल्यास जागतिक स्तरावरील ‘रामसर’चा मिळालेला दर्जाही संकटात येऊ शकतो. डिसेंबर महिन्यात केंद्र व राज्य सरकारकडून संयुक्तरीत्या रामसर स्थळांचे क्षेत्रीय सर्वेक्षण अमृत धरोहर योजनेअंतर्गत करण्यात आले होते.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकारच्या वतीने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात दोनदिवसीय दौऱ्यावर चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटच्या पाच शास्त्रज्ञांनी भेट दिली होती. त्यांनी जलचर परिसंस्थेबाबतची निरीक्षणे नोंदविली. गोदावरी-कादवा नद्यांचा संगम क्षेत्र आणि तेथून पुढे बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाहाची पाहणी केली होती. या ठिकाणांहून पाण्याचे नमुनेही संकलित केले असून त्याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला तसेच नाशिक वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.
जलप्रदूषणाची तीव्रताही येणार समोर
नांदूरमधमेश्वर अभयारण्यात नाशिक शहरातून गोदावरी व ग्रामीणमधून कादवा या दोन नद्यांचे पाणी जाते. गोदावरीमध्ये शहरी भागातून सांडपाणी महापालिकेच्या मलजल केंद्रातून सोडण्यात येते. यामुळे पाण्याचे प्रदूषणाचे प्रमाण व तीव्रता किती आहे? भविष्यात नांदूर-मधमेश्वरसारख्या रामसर दर्जा मिळालेल्या पाणस्थळाच्या संवर्धनासाठी असलेले धोके याबाबत या अभ्यासदौऱ्यानंतर ठोस माहिती हाती येणार आहे.
गाळ, मातीचेही केलेे परीक्षण
नांदूरमधमेश्वर अभयारण्यातून केवळ जल नमुने नव्हे तर गाळ, मातीचेही नमुने शास्त्रज्ञांच्या चमूकडून संकलित करण्यात आले आहे. चेन्नईच्या इन्स्टिट्यूटमध्ये याचे परीक्षण केले जाणार आहे. त्यावरून निष्कर्ष दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आजूबाजूला असलेली ऊसशेती, द्राक्ष शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व रासायनिक खतेदेखील पाण्याच्या माध्यमातून नदीप्रवाहात मिसळून नायट्रोजन, सल्फरसारख्या घातक प्रदूषकांचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
अभयारण्याची हद्द कधी ठरणार !
अभयारण्याच्या सीमांकनाचे घोंगडे लालफितीच्या कारभारात भिजत पडले आहे. अभयारण्याच्या विकासाच्या दृष्टीने स्थानिक सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस प्रयत्न केले गेले नाही, ही शोकांतिका आहे. महसूल व जलसंपदा विभागाने पुढाकार घेतल्यास अभयारण्याच्या सीमांकनावर शिक्कामोर्तब होईल. जलसंपदा विभागाने वन्यजीव विभागासोबत समन्वय साधून गांभीर्याने प्रयत्न केल्यास सीमांकनाचे त्रांगडे सुटण्यास मदत होईल, असे बोलले जात आहे.