Join us

नाशिक जिल्ह्यातील कोणत्या धरणांत किती पाणी? जाणून घ्या सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 2:02 PM

आजच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांत अवघा 52 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. 

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असून राज्यभरातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक विहिरी, नद्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा देखील कमी होत चालला असून धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. आजच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांत अवघा 52 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. 

नाशिक जिल्ह्यातील एकूण २४ प्रकल्प असून यंदा राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यातील तालुके देखील दुष्काळ सदृश्य परिस्थितीशी झुंज देत आहेत. अशावेळी जिल्ह्याची मदार असलेल्या धरणातील पाणीसाठा देखील कमी होत आहे. अनेक धरणे तर कोरडीठाक होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला असता गंगापूर धरणांत 65 टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणातील पाणीसाठा चिंतेत भर टाकणारा आहे. कारण मागील वर्ष या सुमारास 79 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे आगामी काळात नाशिक शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. 

दुसरीकडे जिल्ह्यातील धरणाचा विचार केला तर कश्यपी धरण 93 टक्के, गौतमी गोदावरी 67 टक्के, आळंदी 63 टक्के, पालखेड 33 टक्के, करंजवण 47 टक्के, ओझरखेड 45 टक्के, दारणा 51 टक्के, भावली 45 टक्के, वालदेवी 88 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 63 टक्के, चणकापूर 65 टक्के, हरणबारी 68 टक्के, गिरणा 41 टक्के, माणिकपुंज 23 टक्के असा एकूण 52 टक्के जलसाठा नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध आहे.

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकपाणीकपातधरणशेतीगंगापूर धरण