नाशिक : यंदा नाशिक जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील टँकरची संख्या 116 पर्यंत पोहोचली असून, मेपर्यंत ही संख्या 200 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये टँकर्सची संख्या शून्य असताना, यंदा मात्र शंभरी पार केल्याने जिल्ह्यासाठी उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील 131 गावे आणि 249 वाड्यांना 116 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
नाशिकमध्ये यंदा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तीन तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. 54 मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी सात तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने दुष्काळाची स्थिती यामुळे समोर येत आहे. ऐन थंडीच्या कालावधीत टँकर सुरू करण्याची नामुष्की ओढावली असून, मे-जून उजाडेपर्यंत जिल्ह्यात टँकरची संख्या दोनशे पार होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
237 वाड्यांमध्ये सध्या टँकर सुरू
जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमध्ये सध्या अनेक गावे आणि वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. नाशिक जिल्ह्यात थंडी वाढत असतानाच टँकर्सचीही संख्या वाढू लागल्याने, संभाव्य दुष्काळाची छाया गडद होत जाणार असल्याचेच एकूण चित्र आहे. मागील महिन्यात 237 वाड्यांमध्ये टँकर सुरू होता, तर आता ही मागणी 249 वाड्यांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यांमधील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याची टक्केवारीही कमी असल्याने जून-जुलै या कालावधीत पाण्याची आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
येवला, मालेगाव तालुक्यांत टँकर्स
मालेगाव आणि येवला तालुक्यातही टँकर सुरू आहेत. येवल्यामध्ये 23 तर मालेगावात 25 टँकरद्वारे स्थानिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही तालुके आगोदरच दुष्काळी जाहीर करण्यात आले असून सद्यस्थितीत या तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.
नांदगाव तालुक्यात सर्वाधिक टँकर्स
नांदगाव तालुक्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने धरणाने केव्हाच तळ गाठला आहे. विशेष म्हणजे, नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर होणे अपेक्षित असताना नांदगावला केवळ दुष्काळसदृश म्हणून काही मंडळे जाहीर करण्यात आली. नांदगावातील दुष्काळी परिस्थितीवर स्थानिक आमदाराने विधानसभेतही नांदगाव दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली होती. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 37 गावे, 162 वाडे अशा एकूण 199 गाववाड्यांना 35 टैंकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे