एकीकडे लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हळूहळू उन्हाळ कांदा काढणीला सुरवातही झाली आहे. मात्र दुसरीकडे पाणी टंचाई आणि वाढत्या उन्हामुळे उभे कांदा पीक वाळुन चालले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणी आणून कांदा जगवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा उन्हाचा कडाका चांगलाच असून त्यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे. नाशिक जिल्ह्यातही पाणी टंचाई आणि वाढत्या उन्हामुळे शेती पिके होरपळून जाऊ लागली आहेत. बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी- नवी शेमळी परिसरात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून शेतकरी कांदा वाचविण्यासाठी विहीर खोदकामावर भर देत आहेत, तर अनेकांकडून टँकरने पाणी आणून पीक जगवले जात आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केल्यामुळे उसनवार पाणी देखील मिळत नसल्याने कांदा कसा काढायचा, हा मोठा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे.
दरम्यान गतवर्षी पावसाळा जेमतेम झाल्याने ऐन उन्हाळ्यात व कांदा मोसमात असताना पाणी कमी पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. एकमेकांना मदतीचा हात दिला जात आहे तर काही शेतकरी विहिरीत साचलेला गाळ काढण्याचे काम करत आहेत. पाण्यासाठी अफाट पैसा खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर बहुतांश शेतकऱ्यांनी पैसा खर्च करून कांदा लागवड केली. परंतु ऐन मोसमात पाणी कमी झाल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणी आणून कांदा जगवण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच खांद्यावर एवढा खर्च आणि त्यात आता टँकरचा खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
शेतकऱ्यांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
२०१८ मध्ये अशीच विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली होती. तेव्हाही शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी पाण्याची पातळी मिळविण्यासाठी अफाट पैसा खर्च केला होता. त्यानंतर यंदाही तीच पुनरावृत्ती झाली. अजून कांदा काढण्यासाठी दोन ते तीन पाण्याची गरज आहे. परंतु विहिरीची पातळी कमी झाल्यामुळे कांदा कसा काढायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- ज्ञानेश्वर कुमावत, शेतकरी, जुनी शेमळी
कांदा लागवडीसाठी १० ते ११ हजार रुपये एकरी खर्च केला. कांदा जगवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असून विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. कांदा काढण्यासाठी विकत पाणी आणून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. एवढे करूनही पदरी काय पडते, हे येणारा काळच ठरवेलं.
- काशीनाथ बोरसे, शेतकरी, जुनी शेमळी