नाशिक : सध्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागांत भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शिवाय माणसांबरोबर पशु प्राण्यांची देखील तहान भागविण्यासाठी दाहीदिशा भटकाव्या लागत आहेत. अशा स्थितीत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून घाटमाथ्यावर पाणवठे तयार करून तहानलेल्या वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील छोट्या मोठ्या नद्या कोरड्याठाक झाल्या असून विहिरींनी देखील तळ गाठला आहे. अनेक छोटे मोठे तलाव मार्च महिन्यातच खपाटीला गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर प्राण्यांची आत्यंतिक गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यातील तहानेची दाहकता कमी करण्यासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून हरसूल वाघेरा घाट त्यानंतर आज पश्चिम घाटातील आंबोली -जव्हार घाटात पाणवठे तयार करण्यात आले.
जुन्या झिऱ्यांना नवसंजीवनी
यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई आहे. यंदा पर्जन्यमान कमालीचे घटल्याने नैसर्गिक डोंगर घाटातील वर्षभर वाहणारे झरे, नाले ही कोरडेठाक पडले आहेत. अशा स्थितीत पश्चिम पट्ट्यातील डोंगर घाटात नैसर्गिक संसाधने ही वनवा, लाकूडतोड यामुळे ओसाड होण्याच्या स्थितीत आहे, त्यात उरल्या सुरल्या डोंगर घळीत थेंब थेंब झिरपणारे पाणी येथील वन्यजीव पक्षी यांची तहान भागवू शकेल याकामी श्रमदान करण्यात आले. जुन्या गाळ झालेल्या, बुजलेल्या झिऱ्यातील गाळ काढून पाझर मोकळे करण्यात आले. तसेच त्याला दगडी पिचिंग करून भक्कम करण्यात आले.
पाणी जिरवायला हवं...
या मोहिमेत श्रमदान करणारे अंबई येथील सोमनाथ भूरबुडे म्हणाले की, दिवसांगणिक नैसर्गिक जल स्रोत अधिक नष्ट होत आहे, हे योग्य नाही, आज श्रमदान मोहिमेतून आमच्या भागात पाणवठे तयार केले. या माध्यमातून मुक्या प्राण्यांना तहान भागवली जाणार आहे. तसेच जिथं जिथं पाणी जिरवता येईल त्या ठिकाणी प्रत्येकाने हे काम करणे या आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जलस्रोत घटत आहेत..
तर शिवकार्य गडकोटचे राम खुर्दळ म्हणाले की, दिवसेंदिवस तापमान वाढत असून पाणी पातळी जोमाने घसरत आहे. हे अतिशय चिंताजनक बाब असून यासाठी जे जे पाणी वाहत आहे, ते अडवून जास्तीत जास्त पाणी जिरवता कसे येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरीकडे जलस्रोत घटत असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वानवा होऊ लागली आहे. म्हणूनच जिथे शक्य होईल, तिथे पाणवठे तयार करण्यावर भर आहे, असेही त्यांनी सांगितले.