Join us

Vidarbha Rain : विदर्भात पाऊस रुसला, खरीप हंगाम फसला, वाचा कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 5:01 PM

Vidarbha Rain : जून सरायला आला तरी पूर्व विदर्भात पाऊस झालेला नाही. परिणामी बळीराजा कमालीचा चिंतातूर झाला आहे.

नागपूर : संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय (Monsoon) झाला असला तरी काही भागांतच पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात अद्यापही पाऊस झालेला नाही. पूर्व विदर्भात पावसाने (Vidarbha) चांगलीच दडी मारली आहे. जून सरायला आला तरी पूर्व विदर्भातपाऊस झालेला नाही. परिणामी बळीराजा कमालीचा चिंतातूर झाला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली (Gadchiroli), गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतील पेरण्या (Kharip Season) खोळंबल्या आहेत. बियाणे करपून जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही. सुरुवातीलाच पाऊस दगा देत असल्याने पुढे काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) १३ तालुक्यांपैकी फक्त काटोल तालुक्यात पावसाने (Nagpur Rain) सरासरी ओलांडली आहे. मात्र, १२ तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे. २४ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३३ मिमी पाऊस पडतो. यंदा या कालावधीत ९३.८ मिलीमीटर पाऊस आला, तो सरासरीच्या तुलनेत २९.५ टक्के कमी आहे. कुही, सावनेर व पारशिवनी या तीन तालुक्यांमध्ये जेमतेम ५९ ते ६५ मिमी इतकाच पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काटोल तालुक्यात १३९.६ मिमी पाऊस झाला. लगतच्या नरखेड तालुक्यात ११४.३ मिमी, नागपूर ग्रामीण ११८.४ मिमी, कळमेश्वर २०३.९ मिमी, तर हिंगणा तालुक्यात १०८.४ मिमी पाऊस पडला. हे पाच तालुके वगळता, जिल्ह्यातील अन्य कोणत्याही तालुक्यात १०० मिमीहून अधिक पाऊस पडलेला नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात काय स्थिती? 

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ७२.३ मिमी पाऊस पडला. त्यामुळे फक्त ९४ हजार ७९९ हेक्टरवर (२०. ६७ टक्के) पेरणी होऊ शकली. कमी पाऊस पडल्याने धरणांतील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात भात क्षेत्र १ लाख ९१ हजार हेक्टर, कापूस १ लाख ८० हजार हेक्टर, तर ७५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन लागवडीचे नियोजन आहे. सर्व पिकांचे एकूण सरासरी क्षेत्र ४५८.७२८ हेक्टर आहे. मात्र, कमी पावसामुळे २०.६७ टक्के क्षेत्रात पेरणी झाली. जिल्ह्यास सरासरी १८३.५ मिमी पाऊस पडतो. गतवर्षी याच काळात पावसाने १०० मिमी ओलांडली होती. 

गडचिरोली जिल्ह्यात काय स्थिती?  

गडचिरोली सर्वाधिक क्षेत्र धान लागवडीखाली असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यापासून एक-दोन तालुके वगळता अजूनपर्यंत जोरदार पाऊस झाला नाही. कोरची, कुरखेडा, धानोरा या तालुक्यांसह अहेरी उपविभागातील भामरागड, मुलचेरा आदी तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात १ ते २४ जून या कालावधीत सरासरी ९५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अल्प पावसामुळे आतापर्यंत एकूण ८ हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच धूळ पेरणी केली. 

गोंदिया जिल्ह्यात काय स्थिती? 

गोंदिया : यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. जिल्ह्यात १ ते २५ जूनदरम्यान १६०.६० मिमी पाऊस पडणे अपेक्षित होता. त्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ ७३.७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२०.०३ मिमी पाऊस पडतो. त्यामुळे शेतकरी सर्वाधिक धानाची लागवड करतात. एवढा पाऊस धानाच्या लागवडीसाठी पुरेसा असतो. जिल्ह्यात खरिपात १ लाख ९३ हजार हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले. मात्र पावसाअभावी आतापर्यंत केवळ चार ते पाच टक्केच पेरण्या झाल्या आहेत. तर ८७ मिमी पावसाची तूट निर्माण झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात काय स्थिती? 

भंडारा जिल्ह्यात १ जूनपासून २३ जूनपर्यंत केवळ सरासरी ४८.६ मिलीमीटर पाऊस बरसल्याची नोंद आहे. पडलेल्या पावसाची टक्केवारी २५.७ टक्के आहे. पेरण्या रखडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. जिल्ह्याचे खरीप क्षेत्र १,८९,१५५ हेक्टर असून आतापर्यंत ४०५ हेक्टरवर पेरणी व लागवड झाली आहे. टक्केवारी केवळ एक आहे. पावसाचा परिणाम पेरण्यांसह व अन्य पीक लागवडीवर झाला आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७२ हजार ६३८ हेक्टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ११८ हेक्टरवर आवत्या धानाची पेरणी झाली आहे. 

दुबार पेरणीची भीती...मागील आठवड्यात आलेल्या पावसामुळे धूळ पेरणी केलेले बियाणे उगवले. या पिकाला आता सातत्याने तुरळक तरी पावसाची गरज आहे. पाऊस लांबल्यास ही पिके उन्हाने करपू शकतात. तर कोरडवाहू जागेत पाऊस आल्यानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा अर्धा हंगाम बिघडू शकतो. त्यामुळे अधूनमधून पाऊस येण्याची आवश्यकता आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने सावनेर, उमरेड, कुही, कामठी, पारशिवनी या तालुक्यांत पेरण्या खोळंबल्या आहेत. मौदा व रामटेक तालुक्यात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. या दोन्ही तालुक्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही. एक- दोन दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :विदर्भपाऊसशेतीहवामानशेती क्षेत्र