भंडारा :भंडारा जिल्हा विकास आराखडाअंतर्गत दुग्ध उत्पादनात (Milk Production) वाढ करणे, चाऱ्याची पौष्टिकता वाढविणे तथा कमी खर्चात चारा उत्पादन करून चाऱ्यावर होणारा अधिकचा खर्च कमी करून आर्थिक उत्पन्नात भर घालणे व रोजगार उपलब्धी, या दृष्टीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पशुसंवर्धन विभागाची बैठक घेतली. पौष्टिक चारा निर्मितीसाठी पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार घेतला असून धानाच्या तणसावार प्रक्रिया करण्यात येणार आहे.
राज्यात १५.१३ लाख हेक्टर क्षेत्राखाली भाताचे उत्पादन (Paddy Production) घेतले जाते, यातून राज्यात जवळपास ३४ लाख मेट्रिक टन भाताच्या धानाचे उत्पादन होते. मात्र, दिवसेंदिवस आधुनिकीकरण व यांत्रिकीकरणामुळे तणसीचा उपयोग कमी होऊ लागला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व अंशतः नागपूर जिल्ह्यात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान भंडारा जिल्ह्यात पशुपालकांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या तणसावर प्रक्रिया करून सकस चारा रूपांतर करणेबाबत चर्चा करण्यात आली. उपलब्ध चाऱ्यापासून टीएमआर ब्लॉक्स तयार करण्याबाबत वरिष्ठ महाप्रबंधक, डॉ. व्ही. श्रीधर यांनी सूचित केले.
दरम्यान उपलब्ध चाऱ्यापासून टीएमआर ब्लॉक्स तयार केल्यानंतर पशुपालकाना साठवणुकीसाठी व टिकविण्यासाठी तथा वाहतुकीसाठी सहज शक्य होतात. पशुपालक याची निर्मिती तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास सहज तयार करू शकतील. या बैठकीत जिल्ह्याची पार्श्वभूमी, योजना व शासन निर्णय यांचे सादरीकरण व माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी सादर केली.चारा प्रक्रिया प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात आत्मा, माविम, तथा कृषी विज्ञान केंद्र, भंडारा (साकोली) अंतर्गत कार्यरत शेतकरी बचत गट, उत्पादक गट यांना कल्चर तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन पुढे यामध्ये रोजगार उपलब्धी करता येईल असे प्रा. डॉ. मांडवगणे यांनी स्पष्ट केले.
मका रोपट्यांपासून मुरघास
भंडारा जिल्ह्यात मका लागवड वाढ झालेली असून धान्य रूपातील मका काढून घेतल्यानंतर उर्वरित रोपटे यापासून मुरघास तयार करता येऊ शकतो. जिल्ह्यात तणस व रब्बी हंगामातील उत्पादनातील उर्वरित वाळलेला चारा यावर कल्चर प्रक्रिया करून निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवता येते. ५ रुपये खर्चामध्ये ५०० मिली दुधात वाढ होत असल्याचे डॉ. मांडगवणे यांनी सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर कल्चर उपलब्ध करून दिले जाईल.