Jaltara Project : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात दुष्काळाची (Drought) दाहकता आणखीनच दाहक होऊ लागली आहे. जवळपास मार्च पासून ते जूनच्या मध्यापर्यंत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येथील महिलांवर येते. शिवाय पाण्याअभावी शेती देखील ओस पडू लागली आहेत. अशातच महाराष्ट्रातील (Maharashtra) जालना जिल्ह्यातील बहुतांश गावात राबविलेला जलतारा प्रकल्प सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून येथील गावांनी दुष्काळावर मात करत गावाला पाणीदार बनवलं आहे. नेमका हा प्रकल्प काय आहे, हे पाहुयात....
महाराष्ट्रातील (Maharashtra Drought) आजही अनेक गावखेड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे थे आहे. यातही मराठवाडा आणि विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागात दरवर्षीं भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तर गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भीषण पुराचा सामना करावा लागतो. यातच ऐन हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही होते. दुसरीकडे उन्हाळ्यात पाण्याअभावी पिके उद्ध्वस्त होतात, पूर आला की सुपीक जमिनीचा वरचा पृष्ठभाग वाहून गेल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. दुसरीकडे भूगर्भातील पाण्याची पातळी इतकी खालावली आहे की कूपनलिकांद्वारेही सिंचन शक्य नाही. यावर उपाय म्हणूनच 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेने काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात 'जलतारा प्रकल्प' (JalTara Project) सुरू केला.
दरम्यान आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून सुरु असलेल्या जलतारा प्रकल्प समन्वयक डॉ. वायाळ म्हणाले की, २०१२ पासून पाण्यावर काम सुरु आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात पाण्याची समस्या असल्याने शासनाने अनेक योजना देखील राबवल्या आहेत. यात नदी पुनर्जीवन, विहीर पुनर्भरण असेल मात्र या योजनांचा फारसा फायदा झालेला दिसून येत नाही. म्हणूनच शेताचं पुनर्भरण करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार डॉ. वायाळ यांच्याच पन्नास एकरच्या क्षेत्रात पन्नास शोषखड्डे खोदण्यात आले. त्यात लहान, मोठे दगड टाकून पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयोग करण्यात आला. आणि हा प्रयोग यशस्वी देखील झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतात असणारी दोन पाऊसात भरणारी विहिर एकाच पाऊसात भरली. शिवाय भूगर्भातील पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत मागील चार वर्षांपासून जलतारा प्रकल्पावर काम सुरु असून आतापर्यंत १८० गावामध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. येणाऱ्या दोन वर्षात आणखी ६५ गावांमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. साधारण डिसेंबर कामाला सुरवात होऊन एप्रिलपर्यंत काम चालते. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सेव्ह ग्राऊंड वॉटर या संस्थेच्या माध्यमातून जलतारा प्रकल्प राबवण्यात येतो. हा अभिनव प्रयोग महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये राबविण्याचा मानस आर्ट ऑफ लिव्हिंगचा असून येत्या काळात यावरही काम होणार असल्याचे डॉ. वायाळ यांनी सांगितले.
नेमका कसा आहे जलतारा प्रयोग
पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर एक एकर क्षेत्रामध्ये पाणी वाहत असताना एका कोपऱ्याला येऊन थांबते. त्या कोपऱ्याला चार फूट रुंद, चार फूट लांब व सहा फूट खोलीचा एक खड्डा केल्या जातो. ज्यामध्ये शेतकऱ्यांनी दगड भरून तो खड्डा बुजून टाकावा. पावसाळ्यात वाहून त्या एक एकरमध्ये आलेले सर्व पाणी त्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भामध्ये जाते. असे प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या शेतात एक एकरमध्ये प्रत्येकी एक खड्डा असं गावभर जेवढे शिवार आहे. त्या ठिकाणी शोष खड्ड्यात पाणी जिरवला जाते. उदा. हजार एकर मध्ये एक हजार खड्डे करता येतात. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून जेसीबी मशीनद्वारे शोष खड्डे करून दिले जातात.