बुलढाणा : यंदा मान्सूनचा कालावधी संपल्यानंतरही जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामात (Rabbi Season) पेरणीचे क्षेत्र वाढविण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तथापि, जिल्ह्यात गहू पिकाला शेतकऱ्यांची मोठी पसंती असते. अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, त्यासाठी काय करावे लागेल, याबाबतचा सल्ला कृषी विभागाने दिला असून, शेतकऱ्यांनी त्याचा अंमल केल्यास पीक उत्पादनात वाढ होऊ शकते.
रब्बी हंगामात पेरणीची योग्य वेळ कोरडवाहू गव्हाची पेरणी (Wheat Sowing) ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तर बागायती गव्हाची वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. तसेच बागायती गहू पेरणी १५ डिसेंबरपर्यंत आटोपती घ्यावी. कोरडवाहू गव्हाची पेरणी (Wheat Farming) जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच करावी आणि बियाणे ओलाव्यात पडेल, याची संपूर्ण काळजी घ्यावी. बागायती पेरणीच्यावेळी जमिनीत पुरेशी ओल नसल्यास ओलीत करून पेरणी करावी.
कोरडवाहू व बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन ओळीत २० सेंमी अंतर ठेवावे. तर बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळीत १८ सेंमी अंतर ठेवावे, गव्हाचे बियाणे पेरणीच्या वेळी ५ ते ६ सेंमी पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी, खरीप पिकानंतर खोल नांगरणी करून व वखराच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. उताराला आडवे सारे पाडून गहू पेरणीसाठी जमीन तयार ठेवावी, पेरणीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत मिसळल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते.
थंडीचे किमान १०० दिवस आवश्यक
बागायती गव्हास पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीची जमीन निवडावी. थंडीचे दिवस जितके जास्त मिळतील तितके पीक वाढीस पोषक ठरून उत्पादनात वाढ होते. गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता थंडीचे किमान १०० दिवस मिळणे आवश्यक आहे.
बियाण्याचे प्रमाण :
कोरडवाहू पेरणीसाठी प्रतिहेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. बागायती वेळेवर पेरणीसाठी १०० किलो प्रतिहेक्टरी (जाड दाण्यांच्या वाणांसाठी बियाण्याचे प्रमाण १२५ किलो प्रतिहेक्टरी) असावे, बागायती उशिरा पेरणीसाठी प्रतिहेक्टरी १५० किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया :
पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किवा व्हिटायेंक्स ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास लावल्यानंतर जीवाणू संवर्धन लावावे.
आंतरमशागत :
तणांच्या बंदोबस्तासाठी सोडियम सॉल्ट या तणनाशकाची प्रतिहेक्टरी एक किलो क्रियाशील मूलद्रव्य ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणी करावी त्याचप्रमाणे गहू पिकातील रुंद पानांच्या तणांच्या बंदोबस्तासाठी अलग्रीप (मेटसफ्युरॉन मेथाईल) या तणनाशकाची प्रतिहेक्टरी ४ ग्रॅम क्रियाशील घटक किवा २० ग्रॅम औषधाची ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २५-३० दिवसापर्यंत फवारणी करावी.
गहू पीक वाढीच्या नाजूक अवस्थांमध्ये पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. पेरणीपूर्वी शेताला पाणी देणे आवश्यक आहे. इतर बाबींची काळजी घेऊन गहू या पिकाचे व्यवस्थापन करावे. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी विभागाशी संपर्क साधावा. ५८ हजार पेक्षा अधिक हेक्टरवर गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी