नाशिक : अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे गव्हाचे पिक यंदा कमी आले आहे. जिल्ह्यासह राज्यभरात गव्हाचा पेरा 60 टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे यंदा मध्य प्रदेश गव्हाचे आगार असून येथील गव्हावरच यंदाही आपल्याकडील लोकांना अवलंबून राहावे लागेल, असे चित्र दिसू लागले आहे. शिवाय रोजच्या आहारात असलेल्या गव्हाची चपातीचा आटाही यामुळे महागणार असल्याची चिन्हे आहेत.
रबी हंगामात महाराष्ट्रातील इतर भागांसह नाशिक जिल्ह्यात गहाचा पेरा गत वर्षापेक्षा निम्म्यावर आला आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून नवीन गहू 2900 ते 3200 रुपये क्विंटलप्रमाणे मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश गव्हाचे आगार असून येथील गव्हावरच यंदाही आपल्याकडील लोकांना अवलंबून राहावे लागेल. जिल्ह्यासह राज्यभरात गव्हाचा पेरा 60 टक्क्यांनी घटला आहे. खरिपाचा लांबलेला हंगाम, उशिराच्या पावसाने लेट सुरू झालेला रबीचा हंगाम, जून ते ऑगस्टदरम्यान कमी झालेला पाऊस, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा फटका या कारणांमुळे गव्हाचा पेरा कमालीचा घटला आहे.
किती हजाराने गव्हाचा पेरा
नाशिक जिल्ह्यात 64 हजार 150 हेक्टरवर गव्हाचा पेरा होणार होता. मात्र, फक्त 22 हजार 552 हेक्टरवर लागवड चालू रबी हंगामात झाली आहे. म्हणजे जवळपास 60 टक्के लागवड गव्हाची यंदा जिल्ह्यात कमी झाली आहे. त्यामुळे जेवणातील पोळी महागेल, कळवण, पेठ तालुक्यात गव्हाच्या 57 टक्के पेरण्या झाल्या. बाकीचे तालुके मात्र बरेच पिछाडीवर आहे. तर निफाड तालुक्यातील 578 हेक्टरवरील गव्हाच्या लागवडीला नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. बाकीच्या तालुक्यात मात्र जेमतेम लागवड झालेल्या गव्हाचे संरक्षण झाले.
गत वर्षापेक्षा ६० टक्के कमी
मागील वर्षी जिल्ह्यात रबी हंगामात जवळपास 40 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची लागवड रबी हंगामात झाली होती. यंदा मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे. शेतकरी अशोक पाटील म्हणाले की, आम्ही सहा एकरवर गव्हाचे पीक घेत असतो; परंतु पावसाअभावी यंदा पेरा घटला. तीन ते चार वर्षानंतर गव्हाची अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनही कमी होणार असून त्याचीच काळजी लागून असल्याचे ते म्हणाले.
सरकारचे एक पाऊल पुढे, मात्र 25 रुपयांत आटा मिळेना
खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विकण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाचे दर किलोमागे 4 ते 6 रुपयांनी कमी होऊ शकतात, अशी माहिती व्यापारी आणि बाजारपेठेतील सूत्रांकडून मिळाली. बिझनेस स्टैंडर्डच्या अहवालानुसार, गहू आणि त्याच्या पिठाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बफर स्टॉकमधून 30 लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली. भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) माध्यमातून येत्या दोन महिन्यांत विविध माध्यमातून या गव्हाची विक्री केली जाणार आहे. सरकारने विकत घेतलेल्या गव्हापासून पीठ बनवले जात असून 'एनसीसीएफ द्वारे साडे सत्तावीस रुपये किलो दराने त्याची विक्री नाशिकसह देशातील 141 शहरांत मोबाइल व्हॅनद्वारे सुरू केली आहे. मात्र, नाशिकमध्ये तरी आटा विक्रीची वाहनेच दिसेनासे झाली आहेत.