नाशिक : यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केली होती तर काढणी सुरू असलेल्या उन्हाळ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने सध्या कांद्याला असलेला बाजारभाव हा परवडण्यायोग्य नसून परिसरातील कांदा उत्पादकांकडून कांद्याच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे. तर काही शेतकरी काढलेला उन्हाळा कांदा साठवणूक करूनदेखील भाव मिळाला नसल्याने ओला कांदा विक्री करीत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी कांद्याची अत्यंत कमी लागवड झाली होती. कांद्याला पोषक वातावरण असल्यामुळे चांगले उत्पादन मिळेल अशी आशा असताना कांदा तयार होण्याच्या शेवटच्या टप्प्यात विहिरींच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने कांद्याला मोठा फटका बसला. यामुळे कांदा उत्पादन ३० ते ४० टक्क्यापर्यंत घटले आहे. सध्या कांद्याला मिळणाऱ्या अल्प बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांदा साठवणुकीवर भर देत आहेत. या वर्षी कमी पावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी राहील, असा कयास होता. सुरुवातीपासून चांगले वातावरण असल्यामुळे कमी पावसात देखील कांद्याचे पीक जोमदार होते मात्र फेब्रुवारीच्या शेवटास गळीताच्या वेळी कांदा उत्पादक पट्टयातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची झालेल्या घटीमुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादन घटले आहे.कांदा काढणीला वेग...
सध्या कांद्याला मिळत असलेल्या सरासरी हजार ते बाराशे रुपये बाजार भावामुळे केंद्र शासनाच्या एक एप्रिलनंतर देखील निर्यात खुली होणार नसल्याच्या सुचनेमुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीवर जोर देऊ लागला आहे. सध्या कळवण तालुक्यात दुसऱ्या तसेच अंतिम टप्प्यातील उन्हाळ कांदा काढणी सुरू आहे. काढणी केलेल्या कांद्याची शेतकऱ्यांकडून चाळीत साठवणूक केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकरी मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या पिळकोससह, सावकी, विठेवाडी, बिजोर, बगडू, भादवण, विसापूर, मानूर, बेज, खेडगाव, रवळजी या परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
पुढील काळात कांद्याची टंचाई?
गिरणा नदीकाठाच्या परिसरातील भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर, या परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सद्यस्थितीत कांदा काढणीसाठी नंदुरबार, साक्री, पिंपळनेर परिसरातून मजुरांच्या टोळ्या दाखल झालेल्या असून देखील शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करत होता. मात्र यावर्षी उत्पादनातील घट, सध्या मिळत असलेला अल्प बाजारभाव व दुष्काळामुळे सर्वत्र कांद्याची पुढील काळात टंचाई जाणवेल अशी शक्यता आहे.