Join us

ऊस उत्पादक शेतकरी खोडवा ऊसाचे संगोपन का करत आहेत? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:56 AM

ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी लागणीच्या ऊसाइतकेच खोडवा पिकास महत्त्व देणे आवश्यक आहे.

राज्यातील अनेक भागात ऊसतोड सुरु असून काही ठिकाणी ऊसतोड आटोपत आली आहे. आता शेतकरी खोडवा उसाचे संगोपन करण्यात व्यस्त दिसून येत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांची उसाची तोड पूर्ण झाली असल्याने शेतकऱ्यांकडून उसाचे बोडके धारदार कोयत्याच्या साहाय्याने जमिनीलगत तोंडण्यात येत आहेत. एकूणच शेतकऱ्यांकडून खोडवा उसाचे संगोपन केले जात आहे. 

महाराष्ट्रात सध्या ऊसतोड हंगाम सुरु हंगामातील ऊस तुटून गेल्यानंतर त्यांचा खोडवा ठेवला जातो. खोडव्याखाली सर्वसाधारणपणे 40 ते 45 टक्के क्षेत्र असते. खोडवा पीक घेणे हे शेतकरी व साखर कारखाना या दोघांनाही आर्थिकदृष्ट्या फार फायद्याचे आहे. ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी लागणीच्या ऊसाइतकेच खोडवा पिकास महत्त्व देणे आवश्यक आहे. खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागवडीच्या ऊसाएवढे किंबहुना त्यापेक्षा जास्त येऊ शकते, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

खोडवा उसाला पूर्वमशागतीची आवश्यकता भासत नसल्याने वेळेची, पैशांची तसेच श्रमाची बचत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून उसाचा खोडवा ठेवण्यावर भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे. खोडवाच्या मुळांची वाढ झपाट्याने होत असल्याने ऊस लागवडीपेक्षा खोडव्यात पक्वता लवकर येत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ऊस तोड पूर्ण झाली असून उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे. असे असले तरी दर बदलत्या हवामानामुळे दुसरे कोणतेही पीक घेण्यापेक्षा खोडवा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत खोडवाचे संगोपन उत्तमरीत्या करण्यात येत असून उन्हाळ्यापर्यंत चांगली वाढ होईल, यातून हातात दोन पैसे येतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

म्हणून खोडवा ठेवण्याचा निर्णय... 

ऊस उत्पादक शेतकरी दिलीप पटेल म्हणाले की, यंदा सुरू उसाची लागवड केली होती. पुरेसा पाऊस नाही, त्यातही जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने उसाला फटका बसला. अनियमित हवामानामुळे, वारा वादळामुळे काहीशी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली असून आता ऊसतोडणी झाल्यावर आता फक्त उसाला पाणी देणे, खते देणे एवढेच असल्याने मशागत करणे वाचणार असल्याने खोडवा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पाचट गोळा करून कंपोस्ट खत तयार करण्यात येत आहे. नांगराच्या साह्याने जमीन भुसभुशीत करण्यात येत आहे. उन्हाळ्याअगोदरच खोडवा ऊस बऱ्यापैकी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

खोडवा ऊस पीक घेण्याचे फायदे काय? 

खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करते. त्यामुळे पाण्याचे ताण पडल्यास उत्पादनात फारशी घट येत नाही.खोडवा पिकासाठी पूर्वमशागत करावी लागत नसल्यामुळे मशागतीवरील खर्च वाचतो.खोडवा घेतल्यामुळे बेणे, बेणेप्रक्रिया व ऊस लागवड इत्यादी खर्चात बचत होते.पहिल्या पिकाची मुळे, डोळे तयार असल्यामुळे खोडवा ऊसाचे फुटवे झपाट्याने वाढतात. फुटवे एकाच वेळी येतात पक्व ऊसाची संख्या चांगली मिळते.खोडवा पीक लागणीपेक्षा एक ते दीड महिना लवकर तयार होते.खोडवा पिकात पाचटाचे आच्छादन करता येत असल्यामुळे तणे काढणे व आंतरमशागतीच्या खर्चात बचत होते.

 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीसाखर कारखानेऊस