नाशिक : जिल्ह्यात कांदा आणि द्राक्ष पिकाचे (Nashik Onion Farming) मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र इतरही फळपिकांची लागवड होऊ लागली आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात डाळींब इस्टेटची स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे डाळींब लागवडीस प्रोत्साहन मिळणार असून निर्यातक्षम उत्पादन, नवनवीन वाणांची निर्मिती, प्रक्रिया उद्योग या सगळ्या गोष्टीला चालना मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब फळबाग (Nashik Pomegranate Estate) लागवडीखाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, देवळा परिसरातील वातावरण डाळिंब पिकास पोषक आहे. तर मालेगाव तालुका डाळिंब उत्पादनात आघाडीवर आहे. तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी उत्पादन क्षम १३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मागील दोन वर्षांपासून डाळिंबास चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा डाळिंब उत्पादनाकडे (Pomegranate Farming) कल वाढला आहे.
आता मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी ५३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तालुका फळ रोपवाटिका निळगव्हाण हे नाशिक जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण, नांदगाव, येवला तसेच शेजारील धुळे जिल्ह्यातील साक्री व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काष्टी येथील कृषी संकुलातील शास्त्रज्ञांच्या तंत्रज्ञान पथकाचा डाळिंब इस्टेट प्रकल्पात सक्रिय सहभाग घेऊन संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर अवलंब करण्यास सोयीचे होणार आहे.
निळगव्हाण येथे डाळिंब इस्टेटला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे निर्यातीसह त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे. शिवाय आता डाळिंब लागवडीस प्रोत्साहन मिळणार असून जिल्ह्यात उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. अनेकदा डाळींब शेती रोगांना बळी पडत असल्याचे चित्र आहे. त्यातही तेल्या रोग निर्मूलनावर काम होणे गरजेचे आहे. आता डाळींब इस्टेटमधून यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. - अरुण देवरे, डाळिंब उत्पादक शेतकरी, करंजाड.
डाळिंब इस्टेटच्या माध्यमातून.....
डाळिंब इस्टेटच्या माध्यमातून रोगमुक्त व गुणवत्तापूर्ण डाळिंब कलमांची निर्मिती करणे, निर्यातीसाठी नवीन वाणाची आवश्यकता व निर्यातक्षम उत्पादन करणे, प्रक्रिया, स्थानिक बाजारपेठ व खाण्याकरीता वाणनिहाय शिफारशी करणे, वाजवी दरात यांत्रिकीकरणाची सुविधा निर्माण करणे, डाळिंब लागवडीसाठी इंडो- इस्त्राईल तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे, मृद, पाणी, ऊती व पाने परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करून शेतकऱ्यांना सुविधा निर्माण करून देणे व त्याप्रमाणे शिफारशी करणे, निविष्ठा विक्री केंद्रातून वाजवी दरात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध करून देणे, डाळिंब इस्टेट प्रकल्पांतर्गत डाळिंब ज्यूस, फ्रोझन डाळिंबाचे उत्पादन, साठवणूक व विक्री निर्यात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.