नाशिक येथे कांदाप्रश्नी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांना देण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार का हे पाहावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून निर्यातबंदीमुळे कांदा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर आज विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनाही पत्र देणार आहे. त्यामुळे एकीकडे कांडा दरावरून आणि मुख्यत्वे निर्यातबंदीवरून शेतकरी असमाधानी आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट होईल का? पीएम नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना वेळ देतील का? हे पाहावे लागणार आहे.
काय म्हटलंय पत्रात?
यावेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा प्रश्नावरील काही महत्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याची इच्छा आहे. केंद्रात कोणतेही सरकार असले तरी कांदा दरात वाढ झाल्यानंतर निर्यातबंदी सारखे निर्णय घेऊन दर नियंत्रित ठेवत असते. या निर्णयामुळे ग्राहकांचे हित जपले जाते. मात्र, कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा प्रामुख्याने कोरडवाहू शेती करतो व कांदा हे त्याचे एकमेव नगदी पीक आहे. या पिकाच्या किमतीवर सातत्याने नियंत्रण ठेवल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून येत नाही. यामुळे सरकारच्या धोरणामुळे सातत्याने होत असलेले कांदा उत्पादकांचे नुकसान, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आदी बाबी थेट पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांच्याशी थेट बोलावे असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत या देशातील अनेक जटील प्रश्न सहजपणे सोडवले आहेत. कांदा प्रश्न त्या तुलनेत सोपा आहे. यामुळे या चर्चेतून पंतप्रधान मोदी निश्चितपणे या प्रश्नावर तोडगा काढतील, असा विश्वास वाटतो. आपल्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 12 जानेवारी रोजी नाशिक येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घडवून घडवून आणावी व चर्चेसाठी वेळ राखीव ठेवावा, ही नम्र विनंती, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिले आहे.