Bhandara : भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) भात हे मुख्य पीक आहे. जिल्ह्यात भात पिकाची लागवड (Paddy Cultivation) मोठ्या प्रमाणात करण्यात येते. भात पिकाची लागवडीसाठी महिलांच्या अधिक योगदान असल्याचे दिसून येते. आठवडाभरापूर्वी पाऊस दमदार झाल्याने भात पिकाची लागवड जोरात सुरू आहे. गावातून तसेच लगतच्या शहरातून महिला मजुरांचे थवे भात रोवणीसाठी पंचवीस-तीस किलोमीटर दूरवर बाहेर पडतात. शेतीच्या बांधावर महिलाच अधिक आहेत.
शेती हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. शेती ग्रामीण विकासाला चालना देण्याचे काम करतात. कृषी क्षेत्रात, विशेषतः भात पिकाच्या उत्पादनात महिलांचा सहभागाचा वाटा मोठा आहे. केवळ कृषी क्षेत्रात नाही, तर विविध क्षेत्रांत महिला वेगाने आगेकूच करीत असल्याचे दिसून येते. भात पीक लागवड, निंदणी ते भात पिकांच्या कापणीपर्यंत शेतमजूर महिलांचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू होतो. सूर्यास्तानंतर सुद्धा घरी येऊन महिला स्वतःला कामाला जुंपून घेतात. पाऊस येतो काय, ढगांच्या गडगडाट होतो काय, तरीही माय माऊली महिला शेतमजूर काळ्या मातीच्या चिखलात खंबीरपणे उभी असते.
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी पावसाळ्यात महिलांना अधिक धोका पत्करावा लागतो. वीज पडून जीव गमावलेल्या महिला मजुरांची संख्या अधिक असल्याचे दिसून येईल. भात पिकाच्या क्षेत्रात सहभाग दर ८० टक्क्यांच्या वर दिसून येते. भात पिकाची लागवडीचे काम कुशल मानले जाते. या कुशल कामात महिलांची हालचाल अनेक पटींनी वाढली आहे. महिलांचे कृषी क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.
दोन्ही हंगामात महिलांचे योगदान अधिकच
भात पीक लागवडीचा हंगाम असो की कापणीचा, या दोन्ही हंगामात महिलांचे योगदान अधिकच दिसून येते. त्याउलट पुरुष कामगार अधिकाधिक कामासाठी शहराच्या दिशेने खेचले गेले आहेत. त्यामुळे शेतमजुरीमध्ये सहभागी होण्याच्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात नजर टाकली असता, पुरुष वर्ग गावात कुठेतरी बसून टाइमपास करीत असल्याचे निदर्शनास येते. कुटुंब प्रमुखाची भूमिका मोठ्या कुशलतेने महिलाच निभावतात, असे आज तरी चित्र ग्रामीण भागात दिसून येते. त्यामुळे ग्रामीण शेतीच्या विकासात अधिक योगदान महिलांचेच असते.